Hot Posts

6/recent/ticker-posts

शहर युवा सेनेच्या महा रक्तदान शिबिराला युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद

शहर युवा सेनेच्या महा रक्तदान शिबिराला युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्र्यांच्या रक्तसंकलन  आवाहनाला युवकांची साथ

सोलापूर (कटूसत्य. वृत्त.): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन महाराष्ट्रातील युवा  सैनिकांना केलेल्या आवाहनाला युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सोलापूर शहर युवा सेनेच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेल्या महा रक्तदान शिबिरांनासुद्धा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. युवकांनी रक्तदान चळवळीत उडी घेत मोठ्या प्रमाणावर रक्तदान करत समाजसेवेला हातभार लावला आहे. 

बुधवारी सोलापूर शहर युवा सेनेच्यावतीने नीलमनगर येथील नवदुर्गा देवस्थान येथे युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमर बोडा आणि अमितकुमार गडगी यांनी आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिराचे उदघाटन शिवसेनेचे शहर प्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर आणि युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या युवकांना गुरूशांत धुत्तरगावकर,विठ्ठल वानकर आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सिद्धेश्वर रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. 

यावेळी बोलतां शहरप्रमुख धुत्तरगावकर म्हणाले,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन युवकांनी केलेल्या रक्तदानामुळे राज्यातील रक्ताच्या तुटवड्याचे प्रमाण कमी होईल. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताचा हा तुटवडा कमी करण्यासाठी युवा सेनेने सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तसंकलनाला मोठा हातभार लावला आहे. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि सोलापूरचे संपर्क प्रमुख विपुल पिंगळे यांच्या आदेशान्वये रक्तदानाचे पवित्र काम हाती घेतले आहे. या रक्तदानाचा फायदा गरजूंना रक्ताचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे, असे विठ्ठल वानकर यांनी सांगितले. 

याप्रसंगी योगेश भोसले,अमर बोडा,शुभम घोलप,अमितकुमार गडगी,रोहित हंचाटे,सचिन गंधुरे, आनंद मुसले, श्रीनिवास गणेरी, वासू गुत्तीकोंडा,नरेश सायपूर,आनंद सायपूर,अंबादास मंथा यांच्यासह युवासेनेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments