समाजवादी महाराष्ट्र निर्माण करण्याच्या उद्देशाने अण्णाभाऊ व सहकाऱ्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा रणसंग्राम केला - कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे

बार्शी दि.१८(क.वृ.): बार्शी नगरपालिका बार्शी यांच्यावतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव 2020 बार्शी नगरपालिका बार्शी या फेसबुक पेज वर ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले. हे व्याख्यान दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी झाले. अण्णाभाऊ व संयुक्त महाराष्ट्राचा लढा या विषयावर कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानाचे पाचवे गुंफले गेले. कॉम्रेड ठोंबरे यांच्या व्याख्यानाने या व्याख्यानमालेचा शेवट करण्यात आला.
व्याख्यानात कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र निर्माण व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राची निर्मिती केली गेली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणजे स्वकीयांनी स्वकीयांशी केलेला लढा आहे. बलिदानाने रक्ताळलेली पाने या रणसंग्रामामध्ये आहेत. या लढ्यामध्ये कॉंग्रेस पक्ष सोडून कम्युनिस्ट, समाजवादी, आरपीआय, शेकप हे सर्व पक्ष एकत्र होते.
सर्व कामगार संघटना यासोबतच कामगारवर्गाची संबंध असणारे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, जैन या समाजाचे लोक होते सोबतच कामगार, विद्यार्थी, शेतकरी हेदेखील या लढ्याचा भाग होते. बार्शी येथील जुनी गिरणी मध्ये काम करणारे कॉम्रेड अमरशेख यांना संपात, कामगार लढयात गाणे गात असणारा शाहीर सदाशिव कराडकर यांनी पाहिला व त्यांनी त्यांना महाराष्ट्राच्या पातळीवरती काम करण्यास नेले. टिटवाळा येथे किसान सभेची स्थापना 1936 साली यावेळी लाल बावटा कला पथकाची यानिमित्ताने अण्णाभाऊ साठे, अमर शेख, दत्तोबा गव्हाणकर हे तीन शाहीर एकत्र आले.
या अगोदर 1921 साली काँग्रेसने अधिवेशनामध्ये भाषावार प्रांतरचना करण्याचा ठराव करून आदिवासी शेतकरी यांचा स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा मिळावा म्हणून ठरावाचे निमित्त केले. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसला जनाधार मिळाल्यावर काँग्रेस सत्तेवर गेल्यानंतर भाषावार प्रांतरचनेला विरोध केला. 1948 साली संयुक्त महाराष्ट्र समिती यांची परिषद झाली या परिषदेमध्ये शाहिरांनी सुधीर फडके यांचे "गर्जा महाराष्ट्र माझा" हे गीत गायले. हेच गीत पुढे या लढ्याचे गीत बनले. लोकांची मागणी बघून काँग्रेसने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाषावार प्रांतरचना करण्याचे कलम टाकले, परंतु सत्ता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे 1952-53 साली पुन्हा जोरदार मागणी वाढली. 1948 साली दार कमिशन नेमले गेले या कमिशनने पाच वर्ष अहवाल देण्यास लावला या अहवालामध्ये एका भाषेचे राज्य निर्माण करण्याची गरज नाही, मुंबई भाषावार प्रांत रचनेत नको असा अहवाल मांडला. टाटा या उद्योगपतीच्या नेतृत्वाखाली उद्योगपतींनी या कमिशनला मुंबई महाराष्ट्राला देण्याला विरोध केला.
1954 च्या नोव्हेंबर मध्ये मुंबईतल्या कामगारांनी नरिमन पार्कला सभा घेतली. या सभेला एक ते दीड लाख लोक हजर होते. या सभेत 21 नोव्हेंबर 1955 रोजी पाच लाखांचा मोर्चा काढण्याचे ठरले. अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गवाणकर हे कार्यकर्ते कलावंत यांनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी जबर प्रयत्न केले. या प्रयत्ना विरोधात काँग्रेसने भाडोत्री कलापथक तयार करून त्यांना पैसा पुरवला, गाड्या दिल्या, स्पीकर दिला लाल बावटा कलापथकचे काम थांबावे यासाठी हा प्रयत्न केला परंतु लोकांनी काँग्रेसने तयार केलेल्या तमाशाच्या फडाकडे पाठ फिरवली. एका सभेमध्ये अण्णाभाऊ, अमरशेख, गव्हाणकर यांचा तमाशा बंद करण्यासाठी पोलीस आले तेथे अण्णाभाऊंनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून चळवळीला उपयोगी असे क्रांतिकारी वळण दिले. अण्णाभाऊ सहकारी शाहिरांनी जनतेचा मेंदू जागवण्याचे काम केले. अण्णाभाऊ एके ठिकाणी म्हणतात "एकजुटीचा नेता झाला कामगार तयार बदला ये दुनिया सारी दुमदुमली ललकार" हे संयुक्त महाराष्ट्राचे गीत बनले. महाराष्ट्रातल्या काँग्रेसची केंद्रातल्या काँग्रेसला विरोध करण्याची हिंमत नसल्याने सखा पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र करण्यास विरोध केला. 1952-53 च्या वसंत व्याख्यानमाले मध्ये यशवंतराव चव्हाण म्हणतात "पंडित नेहरू किंवा मुंबई यापैकी मला काही निवडायला सांगितले तर मी नेहरूंची निवड करीन" त्यामुळे यशवंतराव हे संयुक्त महाराष्ट्राचाच्या विरोधी होते महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाणानी आणला हे खोटे बिंबवले. प्रतापगडावर नेहरू आले असता वाईपासून गडापर्यंत लोकांनी काळे झेंडे दाखवून त्यांना विरोध केला. पुढे काँग्रेसने महाराष्ट्र देऊ परंतू मुंबई देणार नाही, आंध्र देऊ पण मद्रास देणार नाही असा पवित्रा घेतला. आंध्रमधील श्रीनामानू या कार्यकर्त्याने 52 दिवस उपोषण केले व त्यात त्यांचा मृत्यू झाला. एका मोर्चावरून घरी जाणाऱ्या जनतेवर मोरारजीभाई देसाई यांनी हुकूमशाही पद्धतीने पोलीसा करवी हल्ला घडवून आणला. मोरारजीभाई देसाई व सखा पाटील यांच्या एका सभेमध्ये लोकांनी त्यांना विरोध केला त्यावर मोरारजीभाई देसाई म्हणाले "पुढे पन्नास हजार वर्ष चंद्र-तारे असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला देणार नाही." विधानसभेवर पाचशे लोकांचा मोर्चा गेला असता त्यांच्यावर पोलीसांकडून हल्ला झाला हल्ल्यामुळे लाखो कामगारलोक चालून विधानसभेवर गेले.
यावेळी एस. एम. जोशी यांनी या लोकांना चौपाटीवर सभा घेण्यास मंजूर केले श्रीपत अमृत डांगे यांनी या सभेचे उद्घाटन केले. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा जोर वाढला. फ्लोरा फाउंटन ला पोलीसांकडून गोळीबार झाला यावेळी 73 लोकांचा बळी गेला. संयुक्त महाराष्ट्राच्या रणसंग्रामात एकूण 106 हुतात्मे झाले. अण्णाभाऊ शाहीरीत म्हणतात, "झालं फाउंटनला रण तिथे रक्ताची धार वाहिली, बिनी मारायची राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली". बेळगाव कारवार हे महाराष्ट्राला न मिळाल्यामुळे अण्णाभाऊ शाहीर म्हणतात "माझी मैना गावाकडे राहिली". बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या चळवळीत आरपीआयचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. त्यामुळे अण्णाभाऊ "मज सांगून गेले भीमराव या गीतात" संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करतात. 1956 पर्यंत मोरारजीभाई देसाई सका पाटील व काँग्रेसची दंडेलशाही चालू होती.
106 हुतात्म्यांना नंतर मोरारजीभाई देसाई यांची पत्रकारांनी मुलाखत घेतली, त्यात ते म्हणतात "महाराष्ट्रातील लोक हे लांडगे आहेत लांडग्यांना शांत करण्यासाठी त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल गरज पडली तर प्रत्येक नागरिकाला मी गोळ्या घालीन." महाराष्ट्राच्या लढ्यावर गोळीबार करण्यासाठी ट्रेन फोर्स गुजरात मधून त्यांनी मागवला होता. मुंबई पोलिसांना बैठक घेऊन सांगितले होते की "मोर्चेकऱ्यांना शांत करण्यासाठी तुमच्या जवळची प्रत्येक गोळी वापरा. या सत्तेचा उन्माद पाहून आण्णाभाऊ म्हणतात "चौदा चौकटींच राज्य रावणाचं लंका जळाली त्याची कलियुगात तीच गत मोरारजी-सखा पाटलाची." महाराष्ट्राचे कौतुक करताना अण्णाभाऊ म्हणतात "महाराष्ट्राचा श्रीमुकुट हा मानाचा चढला, मुंबई हा हिरा त्यात गढला." सुरेश भटांनी या रणसंग्रामात सहभाग राहिला आहे. अखेर हा सर्व रणसंग्राम पाहून सरकारने 1956 साठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केली परंतु बेळगाव कारवार निपाणी हे काळीज तोडून टाकले. आजही या काळजा साठी लढाई चालू आहे . बलिदानातून तीव्र संघर्षातून, अन्यायाविरुद्ध लालबावटा फडकवून, रक्ताचं स्नान घालून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख, दत्तोबा गव्हाणकर अशा शाहिरांच्या नेतृत्वाखाली श्रमिक, कामगार, शेतकरी, विद्यार्थ्यांनी संयुक्त महाराष्ट्र घडवला आहे.
व्याख्यानमालेचा समारोप समितीचे श्रीधर कांबळे यांनी केला. ही व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत तसेच बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी यांनी विशेष प्रयत्न केले. या व्याख्यानमालेचे कामकाज पाहण्यासाठी बार्शीतील सर्व नगरसेवक नगरपालिकेतील अधिकारीवर्ग त्याचबरोबर सेवकांनी प्रयत्न केले आहेत. यावेळी सूत्रसंचालन प्रवीण मस्तुद यांनी केले तांत्रिक जबाबदारी पवन आहिरे यांनी सांभाळली.
0 Comments