बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे प्रथम आंध्र प्रदेश,तेलंगणा आणि आता महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धो धो कोसळत आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे यात शेतकरी वर्गलाच नाही तर सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक,जीवित हानी सोसावी लागत आहे. कोरोना सारख्या महा भयंकर महामारीत अशा प्रकारचा निसर्गाचा कोप चिंताजनक आहे.या संकटात स्थानिक पातळीवर प्रतिनिधी आणि युवक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याच काम करत आहेत.
विदर्भात हाता तोंडाला आलेलं सोयाबीन पाण्यात गेलंय, पश्चिम महाराष्ट्रात ऊस पाण्यात झोपलाय तर कोकणात अगोदरच चक्री वादळाचा फटका कमी की काय म्हणून भाताची शेती पाण्यात वाहून गेलीय.
काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीच्या गंजी वाहून गेल्या ,मुकी जनावरे वाहून गेली तर
कुणाच्या घरात पाणी आहे, कुणाच्या घरावराचे पत्रे उडून गेलेत तर कोणी पाण्यात वाहून गेलाय.
कालची एक बातमी मन सुन्न करून टाकते ती म्हणजे पंढरपूर मध्ये कुंभारी घाटात पावसापासून बचाव करण्यासाठी भिंतीच्या आडोश्याला उभा राहणाऱ्या सहा जणांना भिंत कोसळून आपला जीव गमावावा लागला. यात लहान चिमुरडा होता तो मामाच्या वाढदिवसाला आजी-आजोबा सोबत आला होता.किती ही विचित्र घटना आहे.अशा कित्येक घटना असल्या ओल्या दुष्काळात नागरिकांना सोसाव्या लागतील देव जाणे.
आता शेतकरी हवालदिल झाला आहे मराठवाड्यातील एक घटना एका न्युज चॅनलवर बघितली एक हतबल शेतकरी हाता तोंडाला आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यामुळे चिखलात बसून टाहो फोडीत आहे.ज्या शेतकऱ्यांन आपल्या पोटच्या लेकरासारख पिकाला जपलं ते पीक आज पाण्यात गेलंय.ज्या शेतीवर अवलंबून आपला उदरनिर्वाह भागवला जातोय तेच साधन आज नियतीनं हिरावून घेतलय आता दुसरं साधन काय हो?आता एवढी मोठी लावलेली ताकद कधी उभा राहणार .सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून झालेली नुकसान भरपाई देवून शेतकरी आणि सामान्य माणसाला आधार देणं गरजेचे आहे.अगोदरच अर्थव्यवस्थेची घडी विस्कटलेली असताना अशी संकट सरकारला आणि सामान्य जनतेला सावरायला खूप वेळ लागणार आहे हे नक्की. श्रीमंत वर्गाचं काही होईल पण गरीबाची दिवाळी गोड होईल की नाही ही शंका आहे.
✍️ गणेश अ. मोरे
डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय औरंगाबाद
0 Comments