महामार्ग प्रशासनाच्या गलथानपणामुळे अपघात वाढले

मोहोळ दि.१२(क.वृ.): दररोज कोट्यवधी रुपयांचा टोल गोळा करणारे महामार्ग प्रशासन पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत काही दक्षता घेताना दिसत नाही. त्यामुळे मोहोळ शहर व परिसर व तालुक्यातील नागरिकातून मोहोळ तालुक्यात महामार्ग प्रशासना बद्दल संतापाची भावना निर्माण होत आहे. कोट्यवधी रुपयांचा टोल घेणाऱ्या प्रशासनाने मोहोळ शहरातील सुविधांकडे डोळेझाक नेमकी कोणाच्या भरवशावर केली आहे याचा काही केल्या उलगडा होत नाही.
गेल्या दोन महिन्यापासून पुणे ते सोलापूर महामार्गावरील मोहोळ परिसरात अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी दुभाजक तोडून देखील राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अशा गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सदर दुभाजक ओलांडून जाणाऱ्या दुचाकी धारकांना अनेक जणांना चिरडताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे एखादा अपघात घडला तर ना महामार्ग विभागाचे ऍम्ब्युलन्स वेळेवर येते ना 108 क्रमांकाची रूग्णवाहीका येते. नागरिकांना सतत संबंधित यंत्रणेला संपर्क करण्यासाठी दक्षता घ्यावी लागते.
महामार्गावर रूट पेट्रोलिंग केवळ कागदोपत्री केले जाते. रूट पेट्रोलिंग न करता एखाद्या ढाब्यावर किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जेवणावळी मध्ये महामार्ग प्रशासनाचे अनेक कर्मचारी गुंतलेले असतात. त्यामुळे एखादा घडलेला गंभीर अपघात सदर पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनास न दिसून आल्याने दुसरे एखाद्या वाहनास अपघात झाल्यावर आणखी एखादे वाहन आदळुन पुन्हा अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असते. मात्र या प्रकाराकडे महामार्ग प्रशासन अत्यंत बेफिकीर आणि दुर्लक्ष करताना दिसत आहे. रुपयांचे डिझेल रूट पेट्रोलिंग वर खर्च टाकणारा महामार्ग प्रशासन नेमके रूप पेट्रोलिंग कुठे करते हे समजण्यास काहीच मार्ग नाही.
गतवर्षी २१ एप्रिल रोजी अनगर फाट्याजवळ एका मोटर सायकलला कंटेनरने धडक दिल्याने होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच गतप्राण झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. काही महीन्यापूर्वी कन्या प्रशाला चौकात एका दुचाकी धारकास एका भरधाव कारने उडवल्याने सदर नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. तर मोहोळ येथील उड्डाणपुलावर एक नादुरुस्त ट्रक उभा राहिल्याने त्यावर भरधाव जाणारा टेंपो आदळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच मयत झाले. विशेष बाब म्हणजे रात्री झालेला अपघात महामार्ग प्रशासनास सकाळपर्यंत दिसून आला नाही. एकीकडे अपघातास कारणीभूत महामार्ग प्रशासनाने ठरत आहे .तर अपघातानंतर वेळेवर ऍम्ब्युलन्स आल्याने अनेक निष्पापांना जीव गमवावा लागत आहे.
0 Comments