कोरोना नियंत्रणासाठी सांगोला नगरपरिषदेमार्फत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहीमेस सुरूवात

सांगोला दि.१७(क.वृ.) : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गृहभेटी,तपासणी आणि कोमॉरबीड आजारी व्यक्तींना उपचार आणि आरोग्य शिक्षण याद्वारे या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण राज्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राज्य शासनाने राबविण्यास सुरुवात केली आहे. यास अनुसरून सांगोला शहरात सांगोला नगरपरिषदेमार्फत या मोहिमेस दिनांक 15 सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत शहरात प्रत्येक कुटुंबात साधारणतः 4 ते 5 सदस्य असल्याचे गृहीत धरून शहरातील जवळपास 8000 कुटुंब व 40,000 नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण 2 फेऱ्यांमध्ये केले जाणार आहे. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा तर दुसऱ्या फेरीचा कालावधी 10 दिवसांचा असेल.
यासाठी नगरपरिषदेने 10 टीम तयार केल्या असून प्रत्येक टीम मध्ये 1 अंगणवाडी सेविका व नगरपरिषदेचे 2 कर्मचारी याप्रमाणे एकूण 3 जण आहेत. यानुसार या 30 जणांकडून संपूर्ण शहराच आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यात नागरिकांच्या शरिराचे तापमान, शरीरातील ऑक्सिजन मात्रा यांचे मोजमाप केले जाणार आहे. तसेच ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येतील अश्या नागरिकांना कोरोना चाचणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविले जाईल व त्यांच्यावर आरोग्य यंत्रणे मार्फत योग्य ते उपचार सुरू केले जातील.
कोरोनावर मात करण्यासाठी त्याच शक्य तितक्या लवकर निदान होणे गरजेचे असते. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांनी 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' मोहीमे अंतर्गत आपल्या घरी आरोग्य तपासणी साठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करून व खरी माहिती देऊन सहकार्य करावे.
0 Comments