Hot Posts

6/recent/ticker-posts

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 28 ऑगस्टपर्यंत

 राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 28 ऑगस्टपर्यंत 


सोलापूर, दि.२६(क.वृ.): परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी 2020-21 ला प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती निवडींसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 28 ऑगस्ट 2020 पर्यंत आहे, विद्यार्थ्यांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

11 मे 2020 च्या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन व आवश्यक त्या कागदपत्रांसह 28 ऑगस्ट 2020 सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत हार्ड कॉपी किंवा स्कॅन कॉपी विभागाच्या अर्ज स्वीकृतीसाठीच्या swfs.applications@gmail.com या ईमेलवर सादर करावा. ईमेलद्वारे पाठविलेल्या अर्जाची हार्ड कॉपी पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावी, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

  • विद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील असावा.
  • विद्यार्थी महाराष्ट्र रहिवाशी असावा.
  • पदव्युत्तर अभ्यासक्रम 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त नसावे.
  • जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या 100 विद्यापीठामध्ये व लंडन स्कूल ऑफ कोनोमिक्समध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा लागू नाही.
  • परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. परंतू द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पूर्ण केलेला अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही.
  • परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील.
  • भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी आणि एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असतील.
  • यापूर्वी शासनाकडून परदेशी शिष्यवृत्ती अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे, असे विद्यार्थीही पीएचडीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
  •  परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँक) 300 च्या आत असावी.
लाभाचे स्वरुप
  • विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम तसेच केंद्र शासनाच्या नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती (National Overseas Scholarship) योजनेअंतर्गत लागू करण्यात आलेली इतर फी (अ) आरोग्य विमा आणि (Visa Fees) या बाबी परदेश शिष्यवृत्तीधारकासाठी अनुज्ञेय असतील.
  •  विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासाठी यु.एस. डॉलर 15,400 तर यु.के.साठी जी.बी.पौंड 9900 इतका अदा करण्यात येतो.
  • विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी कमीत कमी कालावधी, नजीकचा मार्ग आणि इकॉनॉमी क्लासचा विमान प्रवासाचा दर दिला जाईल.
  • विद्यार्थ्याला आकस्मित खर्चासाठी यु.एस.ए. व इतर देशांसाठी यु.एस. डॉलर 1500 तर यु.के. साठी जी.बी.पौंड 1,100 इतके देण्यात येतात. यामध्ये पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चाचा समावेश आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments