टेंभू, म्हैसाळ व निरा उजवा कालव्याची उर्वरित कामे पूर्ण करून सांगोला तालुक्यातील सर्व क्षेत्र ओलिताखाली आणावे : मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची जलसंपदामंत्री यांच्याकडे आग्रही मागणी
जलसंपदामंत्री जयंतरावजी पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद
सांगोला प्रतिनिधी : टेंभू, म्हैसाळ व नीरा उजवा कालवा या सिंचन योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च झाले परंतु अद्यापि सिंचन योजना अर्धवट आहेत. यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व इतर कामावर दरवर्षी शासनाचा लाखो- कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. परंपरेच्या दुष्काळाचा सामना करताना सांगोला तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तालुक्यातील सिंचन योजनेची कामे पूर्णत्वाला आणणे गरजेचे आहे. म्हणून सांगोला तालुक्याला वरदान ठरणाऱ्या टेंभू म्हैसाळ व नीरा उजवा कालव्याची अर्धवट कामे पूर्ण करून सांगोला तालुक्यातील सर्व क्षेत्र ओलिताखाली आणावे अशी आग्रही मागणी मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील हे सोलापूर दौऱ्यावर जात असताना सांगोला येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भवन येथे भेट दिली असता यांच्याकडे केली आहे. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबतीत निर्णय घेऊन सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले.
कार्यतपस्वी आ. कै.काकासाहेब साळुंखे पाटील यांनी तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने पाण्याच्या योजना पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र अस्थरिकरणा अभावी सदर योजनेची कामे रखडली होती. यामध्ये सांगोल्यावरिल नेते मंडळी कडून अस्थरीकरणाला विरोध केल्यामुळे सदर योजनची कामे लांबणीबर पडली होती. परंतू माढा मतदार संघातून निवडून आल्यानंतर खा. शरदचंद्रजी पवार यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर व संबधित अधिकारी यांच्या समवेत तातडीची बैठक लावून अस्थरीकरणाची कामे पूर्ण केली.
त्या अस्थरीकरणामुळे पाण्याची गळती थांबून पाण्याची बचत झाली आहे. हे वाचलेले पाणी तालुक्यातील शेतीला मिळत आहे. पाणी वाटप करताना टेल टु हेड असे नियमानुसार वाटप करण्यासाठी प्रयत्न होत आहे. सदर योजना पूर्णत्वाला आणण्यासाठी पवार साहेबांचे योगदान लक्षात घेता, त्या. त्यांचे आभार मानने कर्तव्य समजुन आज स्वप्नात ही खर न वाटणारे टेंभू म्हैसाळ व निरा उजवा कालव्याचे पाणी शिवारात आल्याने तालुक्यातील काही भाग ओलिताखाली आला आहे.
टेंभू व म्हैसाळ योजनांच्या पाण्याने सांगोला तालुक्यात प्रवेश केला आहे. आता ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवणे यातच मला समाधान आहे. सांगोला तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व फळ बागा वाचण्यासाठी टेंभु -म्हैसाळ व निरा उजवा कालव्याचे पाणी शेतीला पाणी मिळालेच पाहिजे. तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून माणनदीस पाणी सोडावे यासाठी तब्बल एक महिना गावकऱ्यांनी तहसिल कार्यालया समोर जनावरांसह ठिय्या आंदोलन केले होते. तसेच तालुक्यातील गावकऱ्यांनी आपली गावे बंद ठेवली होती. तर काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. पाण्यासाठी मोठ-मोठी आंदोलन व संघर्ष केला होता. त्याचबरोबर तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मागील अनेक वर्षापासून आम्ही लोकप्रतिनिधी यांच्यासह जनतेचा आक्रमक लढा सुरु आहे. या लढ्याला काही प्रमाणात यश मिळाले आहे. त्याचबरोबर अर्धवट पाण्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी आज अखेर प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील काही भागाला वरदान ठरलेल्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कॅनॉलद्वारे जाते, तसेच नीरा उजवा कालवा यामधून तालुक्यातील काही भागाला कॅनॉलद्वारे पाणी मिळते, सध्या काही भागाला पाणी पुरवठा होत आहे. परंतु आज ही तालुक्यातील अनेक गावे या पाण्याच्या योजनेपासून वंचित आहेत. जर का हत्तीने जलसिंचन योजनेचे पाणी तालुक्याला मिळाले तर शासनाच्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. तसेच तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे. म्हणून टेंभू, म्हैसाळ व निरा उजवा कालव्याची उर्वरित कामे पूर्ण करून सांगोला तालुक्यातील सर्व क्षेत्र ओलिताखाली आणावे अशी मगाणी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
सदर मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबतीत निर्णय घेऊन सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे राज्याच्या जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील यांनी सांगितले आहे.
इथून पुढच्या काळामध्ये पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये टेल टू हेडच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील यांनी सांगितले आहे. सदरची अंमलबजावणी काटेकोरपणे झाल्यास सांगोला तालुक्यावरचा परंपरागत पाण्याच्या बाबतीत होणारा अन्याय निश्चितपणे दूर होवून तालुक्याच्या वाट्याला येणारे पाणी पूर्णक्षमतेने तालुक्याला मिळेल : मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील
0 Comments