पंढरपूर तालुक्यात येणाऱ्या
नागरिकांची होणार कसून तपासणी
उपविभागीय पोलीस अधिकारी-डॉ. सागर कवडे
पंढरपूर - लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिक, विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांना आपआपल्या गावी जाण्यासाठी तसेच जिल्हयात येण्यासाठी राज्य शासनाने कार्यप्रणाली जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या नागरीकांसाठी संबधित प्रशासनाने दिलेला नोंदणीकृत पास व वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे. तपासणीसाठी चेक नाके 24 तास सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली.
परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून परतलेल्या नागरिकांची माहिती गावपातळीवर ग्रामस्तरीय समिती शहर पातळी वार्डस्तरीय समिती कडून संकलित केली जाणार असून, खबरदारीचा उपाय म्हणून येणा-या सर्व नागरिकांची सर्दी, ताप, खोकला आदी तपासणी करण्यात येणार आहे. त्यात काही लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार पुढील आवश्यक तपासणी करण्यात येणार आहे. तालुक्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार होम क्वारंटाईन व संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अशा नागरिकांनी इतरत्र कोठेही फिरु नये असेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे यांनी सांगितले.
तालुक्यातून परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांनी राज्य शासनाने दिलेल्या सुचनेनुसार प्रवासाचा निश्चित मार्ग व कालावधी नमूद करुन देण्यात आलेल्या पास, ओळखपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत ठेवावे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम परवानगी मिळल्यानंतरच संबधित नागरिकांनी प्रवासास सुरुवात करावी. कोणत्याही गैरमार्गाने प्रवास करुन नये तसेच येऊ नये असे आवाहनही उपविभागीय अधिकारी डॉ.कवडे यांनी केले आहे.
0 Comments