सरकारने शेतीपंपाची एक वर्षाची व घरगुती तीन महिन्याची वीज बिले सरसकट माफ करावीत
भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांची निवेदनाद्वारे मागणी
सांगोला (तालुका प्रतिनिधी): कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी दीड महिन्यापासून लॉकडाऊन व संचारबंदी जारी करण्यात आली आहे. सर्व व्यवहार, बाजारपेठा, रोजगार ठप्प असल्याने शेतकऱ्यासह सर्वाना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने शेती पंपाची एक वर्षाची व घरगुती तीन महिन्यांची वीज बिले सरसकट माफ करण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे निवेदन तहसीलदार योगेश खरमाटे यांना देण्यात आले असून निवेदनाच्या प्रती ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पाठवल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जवळपास दीड महिन्यापासून लॉकडाऊन संचारबंदी जारी केली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. याचा सर्वात जास्त फटका शेतीला व लहान व्यावसायिक, कामगार, मजूर यांना बसला आहे.
लहान मोठी दुकाने, शेती पूरक उद्योग, बांधकाम यासह संपूर्ण बाजारपेठ ठप्प असल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. त्यात शेतीमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला, फळे, शेतीमाल शेतातच सडून गेला आहे. दुष्काळाच्या संकटात आणखीनच भर पडली आहे. या भीषण संकटकाळात सरकारने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.
लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळत नाही, मजूर, कामगार यांच्या हाताला काम नाही, लहान-मोठे व्यवसाय बंद आहेत. यामुळे आर्थिक परिस्थिती डाऊन झाली आहे. या संकटकाळात शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला दिलासा देण्याची खरी गरज आहे.
कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतीपंपाची एक वर्षाची व घरगुती ग्राहकांची तीन महिन्याची वीज बिले सरसकट माफ करावीत. मार्च, एप्रिल व मे महिन्यातील घरगुती वीज ग्राहकांची वीज बिले माफ करावीत. कोरोनाचा सर्वात जास्त फटका शेती क्षेत्राला बसला असल्याने शेतीपंपाची एक वर्षाची वीज बिले माफ करावीत.
या संकटकाळात राज्य सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेत वीज बिले माफ करावीत अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार योगेश खरमाटे यांच्याकडे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पाठवल्या आहेत.
0 Comments