टेंभुर्णी - पोलीस जीपला पिकअप टेंम्पोची जोरदार धडक बसल्याने पोलीस जीप मधील पोलीस निरीक्षकासह सहाजण जखमी
टेंभुर्णी : - टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंग करीत असलेल्या शासकीय पोलीस जीपला पिकअप टेंम्पोची जोरदार धडक बसल्याने पोलीस जीप मधील पोलीस निरीक्षकासह सहाजण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री ९.४५ वा.सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील भिमानगर येथे घडली आहे.हा अपघात एवढा भीषण होता की,या अपघातात जीपच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला असून पोलीस अधिकारी व कर्मचारी हे सुदैवाने बचावले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे,एएसआय अशोक बाबर,पोकॉ.धनाजी शेळके,चालक पोकॉ.महेश निळे हे कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर भिमानगर येथील नाकाबंदीच्या पॉइंटवर भेट देण्यासाठी सोमवारी रात्री सात वा.सुमारास टेंभुर्णीतून शासकीय जीपमधून (क्र- एम.एच.१३ बी.क्यू-०१५२) महामार्गावर पेट्रोलिंग करीत गेले होते.तेथे आपत्कालीन आपत्ती व्यवस्थापन नाक्याची पाहणी करून तेथील पोलीस मित्र राजू बनसोडे,तानाजी गायकवाड दोघे रा.भिमानगर व बापू गलांडे रा.रांझणी यांना पोलीस जीप मध्ये घेऊन सर्वजण टेंभुर्णीकडे परत येण्यास निघाले होते.
एवढ्यात रात्री ९.४५ वा.सुमारास महामार्गावरील भिमानगर येथील सरदारजी ढाब्या समोरून माल वाहतूक करणारा पिकअप टेम्पो (क्र-एम.एच-४५-एएफ-३६९६) कोणतीही पूर्व सूचना न देता वळण घेण्यासाठी रस्त्यावर आडवा आल्याने पोलीस जीपची पिकआपला जोरदार धडक बसली.
या धडकेत जीपमधील पोनि राजकुमार केंद्रे,एएसआय अशोक बाबर,पोकॉ.धनाजी शेळके,पोलीस जीप चालक पोकॉ महेश निळे,पोलिस मित्र राजू बनसोडे व बापूराव गलांडे असे सहाजण जखमी झाले.अपघात होताच भिमानगर येथील नाकाबंदीसाठी तैनात पोलीस कर्मचारी,नागरिक यांनी सर्व जखमींना तातडीने टेंभुर्णी येथे उपचारास आणले.अपघातात पोनि राजकुमार केंद्रे यांच्या पायास फ्रॅक्चर झाले तर एएसआय अशोक बाबर यांच्या डोक्यास टाके पडले असून पोलीस मित्र राजू बनसोडे,बापू गलांडे हेही मार लागून गंभीर जखमी झाले.सर्व जखमींवर पाटील हॉस्पिटलचे डॉ.राहुल पाटील व त्यांच्या टीमने उपचार केले असून पोनि केंद्रे यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी अकलूज येथे हलविण्यात येणार आहे.
अपघात होताच टेम्पो चालक लखन नामदेव कदम रा.रांझणी हा पळून गेला असून हा टेम्पो रांझणी येथील नितीन श्रीमंत जाधव यांच्या मालकीचा असल्याचे तपासात समोर आले.
अपघाताची माहिती मिळताच करमाळा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांनी भेट देऊन जखमी पोलीस अधिकारी कर्मचारी यांची विचारपुस केली.तर अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी मंगळवारी सकाळी जखमींची भेट घेवुन अपघात स्थळास भेट देऊन माहिती घेतली.
पोकॉ महेश तुळशीराम निळे यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment