जिल्ह्यात सुरू झाले 67 कारखाने
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली माहिती
सोलापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य शासनाने नगर परिषद आणि महानगर पालिकांच्या हद्दीबाहेरील कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत 67 कारखाने सुरु झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 171 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 67 कारखाने सुरू झाले आहेत. हे कारखाने औषधे, अन्नपदार्थ, अन्न आणि औषधी पदार्थ, पॅकेजिंग, सॅनिटाझर, खते, शेतीपूरक यंत्रसामग्री याचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात सुरू झालेल्या कारखान्यात काम करणारे कामगार ग्रामीण भागातील असल्याने, राज्य शासनाच्या सूचनेनुसार कामगारांची राहण्याची व्यवस्था ही कारखान्याच्या ठिकाणीच करावी किंवा कामगारांची बसमधून ने आण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.
उद्योजकांनी कारखाने सुरू करण्यासाठी http://permission.midcindia. org या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. उद्योजकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वेबसाईटवर परवानगीपत्र तयार होते. ते डाऊनलोड करून घ्यायचे आहे. उद्योजकांना काही अडचण आल्यास त्यांनी 0217-2605232 या दूरध्वनीवर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा समन्वय अधिकारी बी.टी. यशवंते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
0 Comments