पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत सुर्वे यांनी वाचवले गायवासराचे प्राण !
सांगोला ( प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकारी सध्या आपल्या कर्तव्यात व्यस्त आहेत. मात्र त्यातूनही वेळ काढून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत सुर्वे यांनी केवळ एका विनंती फोनवर घटनास्थळी भेट देऊन एका गाईचे व तिच्या वासराचे प्राण वाचवले. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
मंगळवारी सकाळी शिवाजीनगर सांगोला या भागातील हिरेमठ सर यांचा पत्रकार राजेंद्र यादव यांना फोन आला आणि एका बेवारस देशी गायीला प्रसूती वेदना सहन होत नसून ती अत्यवस्थ असल्याने कुत्रे त्या गाईला त्रास देत असल्याची माहिती कळवली. त्यानंतर लागलीच पत्रकार यादव यांनी सांगोला येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुर्वे यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. डॉ. सुर्वे यांनी तातडीने शिवाजीनगर परिसरातील घटनास्थळ गाठले. आणि सदर गायीला प्रसूती वेदना असह्य झाल्याने तसेच मायांग बाहेर आल्याने ती अत्यवस्थ झाल्याचे दिसले. डॉ. सुर्वे यांनी लागलीच प्रयत्न करून तिचे मायांग व्यवस्थित केले व या गायीचा जीव वाचवला. तत्पूर्वी हिरेमठ सर यांनी सदर गायीची प्रसूती होत असताना तिला होत असलेला त्रास पाहून गाईच्या वासराला सुखरूप जन्म देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मात्र मायांग बाहेर असल्याने ही गाय अत्यवस्थ होती, ती उभीही राहू शकत नव्हती. त्यासाठी जाणकाराची गरज असल्याने त्यांनी या गायीचे फोटो पत्रकार यादव यांना पाठवून सहकार्य करण्याची विनंती केली. यादव यांनी डॉ. सुर्वे यांना फोनवरून विनंती केल्यानंतर डॉ. सुर्वे यांनी तातडीने याची दखल घेत सदर गायीवर वेळीच उपचार केल्यामुळे जीवदान मिळाले. ही गाय मारकी असल्यामुळे तिच्याजवळ जाण्यासाठी कोणी धजावत नव्हते मात्र डॉ. सुर्वे यांनी आपल्या कौशल्याने त्या गायीजवळ जाऊन वेळीच योग्य असे उपचार केल्यामुळे ती उठून ऊभी राहिली आणि वासराला जवळ घेतले. हे उपचार वेळीच झाले नसते तर गाय आणि वासराचे प्राण कदाचित धोक्यात आले असते. या देशी गायीला व वासराला डॉ. सुर्वे यांनी वेळीच उपचार केल्याबद्दल व हिरेमठ सरांनी जागरूकता दाखवल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
डॉ. सुर्वे यांनी यापूर्वीही अशा अनेक भटक्या, बेवारस व अपघातामुळे त्रस्त झालेल्या अनेक मुक्या प्राण्यांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
0 Comments