पुण्यात आणखी एक महिला कोरोनाबाधित राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४२
- आरोग्यमंत्री राजेश टोपे
...
- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.१८: राज्यात आज आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४२ झाली आहे. त्यातील एका व्यक्तीचा काल मुंबईत मृत्यू झाला आहे. कोरोनाबधित ही ३२ वर्षीय महिला नेदरलँडवरुन दुबई मार्गे पुण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे:-
पिंपरी चिंचवड मनपा १०, पुणे मनपा ८, मुंबई ७, नागपूर ४,
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी-३,
रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी-१
एकूण : ४२ राज्यात आज ५८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण १२२७ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ९५८ जणांना भरती करण्यात आले होतं. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर ४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १२२७ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
महा डी.बी.टी पोर्टलचा कृषी मंत्र्यांकडून आढावा
मुंबई, : शेतकऱ्यांना कृषी योजनांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलविषयी आज कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित होते.कृषीमंत्री .भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता ‘महाडीबीटी’ पोर्टल विकसित करण्यात येत आहे. विभागाच्या वतीने यावेळी कृषीमंत्र्यांना पोर्टलबाबत सादरीकरण करण्यात आले.‘महाडीबीटी’ पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचा या पोर्टलमध्ये समावेश करता येईल याबद्दलही विचार करावा, अशी सूचना .भुसे यांनी केली.शेतकऱ्यांकरिता असलेली पिक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत, या योजनांचा समावेश नव्यानेच विकसित करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टलमध्ये करावा. कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी दिले.या पोर्टलमध्ये सध्या 13 योजनांची माहिती संकलित करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतिने यावेळी कृषीमंत्र्यांना पोर्टलबाबत सादरीकरण करण्यात आले.
रोगजंतुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी साबणाने वेळोवेळी हात धुण्याची सवय आवश्यक
मुंबई, : मानवी हात हा वेगवेगळ्या रोगजंतुंचा वाहक ठरतो. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सध्या वेळोवेळी हात धुण्याचे महत्व अधोरेखीत झाले आहे. पण फक्त कोरोनाच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही लोकांनी वेळोवेळी साबणाने हात धुणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. यातून आपण नानाविध आजार टाळू शकतो. पण सध्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी लोकांनी साबणाने वेळोवेळी हात धुण्याची सवय अंगिकारणे गरजेचे झाले आहे. साबणाने हात केव्हा धुवावेत ? जेवणापूर्वी, शौचाहून आल्यानंतर, स्वयंपाकापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी, बाळाचा शौच स्वच्छ केल्यानंतर, प्रवास संपवून घरात, कार्यालयात आल्यानंतर इत्यादी वेळीहात धुण्याच्या सवयीने आपण अतिसार, हगवण, पटकी, विषमज्वर, पोलिओ, काविळ, स्वाईन फ्लू, कोरोना विषाणू इत्यादी रोग टाळू शकतोआजार टाळण्यासाठी स्वच्छतेविषयक काळजी सर्व काळात घेणे आवश्यक असते. किंबहुना स्वच्छता ही आपली जीवनशैली बनणे गरजेचे आहे. पण बरेचजण याविषयी फक्त साथीच्या काळातच काळजी घेताना दिसतात. फक्त साथीच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही स्वच्छतेविषयक काळजी घेणे तसेच वेळोवेळी साबणाने हात धुणे अत्यंत गरजेचे आहे.हात का व केव्हा धुवावेत ? आपले हात नेहमीच घामेजलेले असतात. नानाविध वस्तुंशी हातांचा संपर्क येत असतो. त्यावेळी त्या वस्तुवरील घाण, रोगजंतू हातातील घामात मिसळतात. हातावर घाणीचा बारीक थर व रोगजंतू जमतात. जेवणापूर्वी हात न धुतल्यास ही घाण व रोगजंतू थेट पोटात जाऊन विविध रोगास कारणीभूत ठरतात. त्यामुळे जेवणापूर्वी साबणाने हात धुणे महत्वाचे ठरते.
·बाळास भरविण्यापूर्वी साबणाने हात धुणे अत्यावश्यक.
स्वयंपाकापूर्वी साबणाने हात धुणे अत्यावश्यक.
मुंबईतील बहुतांश लोक दररोज रेल्वे अथवा बसने प्रवास करतात. रेल्वे, बसमध्ये हात पकडण्यासाठी लावण्यात आलेले हँगर अनेक व्यक्तिंच्या हाताच्या स्पर्शाने, त्यातील घाम व घाणीने दुषीत झालेले असतात. आपल्या हातांचा या हँगरशी संपर्क येतो व आपले हातही दुषीत होतात. त्यामुळे प्रवास संपल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.नेहमी प्रवास करणाऱ्यांनी आपल्या सोबत पेपरसोप ठेवावा व हात धुण्यासाठी त्याचा वेळोवेळी वापर करावा.
हात धुण्याची पद्धती फक्त पाण्याने हात धुऊ नयेत. यासाठी पाण्याबरोबर साबणाचा वापर करावा. सुरुवातीस पाण्याने हात ओला करावा. त्यानंतर साबणाने तळहातावर फेस करावा. हा फेस बोटे, बोटांच्या खाची, तळहात व मनगटापर्यंत सुमारे २० ते ३० सेकंद चोळावा. नंतर हा फेस पाण्याने स्वच्छ धुवावा. तद्नंतर हात वाळवावेत किंवा स्वच्छ कापडाने पुसावेत.
हात कशाने धुवावेत ?
हात साबणाने किंवा (साबण उपलब्ध नसल्यास राखेने) धुवावेत. हात धुण्यासाठी लिक्विड सोप किंवा प्रवासादरम्यान पेपर सोपही वापरता येईल.
हे टाळ हात मातीने अजिबात धुवू नयेत. मातीमध्ये रोगजंतू असण्याची शक्यता असते. त्यामुळे यातून रोगप्रसार होण्याची शक्यता असते.
हे पाळा हात धुण्याबरोबर हाताची नखे नियमित कापणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण बरेच रोगजंतू व घाण नखात अडकते. जेवताना हे रोगजंतू किंवा घाण पोटात जाते व विविध रोगास कारणीभूत ठरते.शौचविधीहून आल्यानंतर हात धुतल्याने साबणसुद्धा दुषीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे शौचाहून आल्यानंतर हात धुण्यासाठी वेगळा साबण वापरावा. लिक्विड सोप वापरल्यास अधिक चांगले.
हस्तांदोलन करताना सावधान !ओळखीच्या व्यक्ती भेटल्यानंतर परस्परांना हस्तांदोलन करण्याची पद्धती सर्वत्र आढळते. खरे तर ही पाश्चिमात्य पद्धती आहे. एका सर्व्हेक्षणानुसार हस्तांदोलन करताना विविध रोगजंतुंचा एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे प्रसार होऊ शकतो. बऱ्याच व्यक्तींना हात धुण्याची सवय नसते. अशा व्यक्तींचे हात रोगजंतुयुक्त असू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींशी हस्तांदोलन केल्यास आपले हातसुद्धा घाण व रोगजंतुंनी प्रभावीत होऊ शकतात. त्यामुळे हस्तांदोलन करताना सावधानता बाळगलेली बरी.जेवण करण्यापूर्वी आणि मलविसर्जनानंतर स्वच्छ हात धुतल्यामुळे अतिसाराशी संबंधीत रोग 50 टक्क्यांनी कमी झाल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे.जागतिक हात धुवा दिनवेळोवेळी हात धुण्याबाबत अनेक लोकांमध्ये कमालीची अनास्था असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यासाठी युनिसेफमार्फत दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक हात धुवा दिन’ साजरा करण्यात येतो. राज्यात यानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये दुपारच्या भोजनापूर्वी प्रत्येकाने साबणाने हात धुण्याची मोहीम राबविण्यात येते. तसेच संबंधित जिल्ह्यातील स्वच्छता अभियान कक्षांच्यावतीने साबणाने हात धुण्याच्या सवयीच्या प्रचारार्थ विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येतात. याअंतर्गत मेळावे, कार्यशाळा, जनजागृती सभा, जनजागृती स्टॉल, शाहिरांचे कार्यक्रम, माहितीपत्रकांचे वितरण अशा माध्यमातून साबणाने वेळोवेळी हात धुण्याचा संदेश सर्वदूर पोहोचविण्यात येतो. स्वच्छतेची शपथ घेऊन आदर्श जीवनाचा संकल्प केला जातो. आपणही आतापासून हा संकल्प पाळूया!
गावी जाण्याची सोय होईपर्यंत
विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती नाही
मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालय दि.३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईपर्यंत वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठे आणि महविद्यालयांना दिल्या..सामंत म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठे, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गावी जाण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली आहे. परंतु, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात, त्यांना गावी जाण्यासाठी तिकीट उपलब्ध होईपर्यंत वसतिगृहात थांबू द्यावे. विद्यार्थ्यांना विश्वासात घ्यावे आणि त्यांची गैरसोय होता कामा नये, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी.परदेशी विद्यार्थी आणि ज्या मुलांना गावी जाणे तत्काळ शक्य नाही असे विद्यार्थी वसतिगृहात राहत असतील तर त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सहकार्य करावे, असेही . सामंत यांनी सांगितले.
कोरोनावर ‘औषधी’ उपाय :कोरोनासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातदारांवर कडक कारवाई करणार
-
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
मुंबई, : कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत असतांना विविध वस्तुंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा/सोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनापासून प्रादूर्भाव होणार नाही, असा चुकीचा दावा करुन दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करित असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनामार्फत गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे. कोणत्याही उत्पादकाने कोरोनावर औषधी उपाय असल्याचा दावा करणारी चुकीची जाहिरात केल्यास किंवा नागरिकांत संभ्रम निर्माण केल्याचे दिसून आल्यास अशा उत्पादक, जाहिरातदार व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले आहे. कोरोनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, स्वायत्त संस्था दिवसरात्र कार्यरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरविल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरिहंत मॅट्रेसेसचे मालकांनी दि. 13 मार्च रोजी एका गुजराथी दैनिक वृत्तपत्रात ‘अरिहंत ॲन्टी कोरोना व्हायरस मॅट्रेस’ या मॅटरेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असे जनतेच्या मनामध्ये समजूत करून जनतेची दिशाभूल करणारी जाहीरात प्रसिद्ध केली. तसेच त्याद्वारे त्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होर्इल असा खोटा दावा करुन जनतेमध्ये त्याबाबत अफवा पसरविली. या मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे गुरक्र 166 भादवि कलम 505(2) सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 52 सह औषधीद्रव्य व जादुटोना (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनियम 1954 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबरोबर विशिष्ट आयुर्वेदिक औषधाचे सेवन केल्यास कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी रोग प्रतिरोधक औषधी अशा आशयाचा मजकूर असलेली आक्षेपार्ह मजकूर असलेली जाहिरात प्रकाशित करून वितरित केल्याबद्दल दि. 16 मार्च रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाने मुंबई येथिल मुलुंड पोलीस स्टेशनला शितल आयुर्वेद भांडार प्रा. लि. या औषध उत्पादन व विक्री कंपनीवर गुन्हा औषधे व जादुटोणा (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यांतर्गत सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही ची तरतूद आहे.
जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार,साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई
- छगन भुजबळ
मुंबई, : जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसेच संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. भुजबळ म्हणाले, सध्यस्थितीत राज्यात करोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा व जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेता जनतेचे दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने जनतेस जीवनावश्यक वस्तु सहजासहजी व रास्तभावात उपलब्ध होणे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा असल्याचे भासवून त्याचा साठा करणे व तो चढ्या भावाने विक्री करणे अशी परिस्थिती उद्भवल्याचे निदर्शनास येत असल्यास जीवनावश्वक वस्तु अधिनियम, 1955 व त्यानुसार निर्गमित इतर नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसचे संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.केंद्र शासनाच्या दि. 13 मार्च, 2020 च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तु अधिनियम, 1955 च्या परिशिष्टामध्ये कलम 2 ए अंतर्गत ‘मास्क (2 प्लाई व 3 प्लाई सर्जिकल मास्क, एन-95 मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर’ यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. याचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यावरही कठोर कारवाई करणार असल्याचेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.
कोरोना आपत्तीसाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटींचा निधी
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेली रोगराई नियंत्रण करण्यासाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटी इतका निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. बाधित जिल्ह्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य कार्यकारी समितीने घेतला आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी 15 कोटी, पुणे विभागासाठी 10 कोटी, नागपूर विभागासाठी 5 कोटी, अमरावतीसाठी 5 कोटी, औरंगाबादसाठी 5 कोटी, नाशिक साठी 5 कोटी याप्रमाणे एकूण 45 कोटीचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव नियंत्रीत करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, Contact Tracing शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 45 कोटी विभागीय आयुक्तांना वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भाती अभ्यास गटाचा अहवाल शासनास सादर बदल्यांसंदर्भातील धोरण लवकरच जाहीर करणार- ग्रामविकास मंत्री . हसन मुश्रीफ
मुंबई, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या अभ्यास गटाने त्यांचा अहवाल आज शासनास सादर केला. ग्रामविकास मंत्री . हसन मुश्रीफ आणि अपर मुख्य सचिव . अरविंद कुमार यांच्याकडे अभ्यास गटाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अभ्यास गटाचे सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. राहूल कर्डिले यांनी हा अहवाल मंत्रालयात सुपुर्द केला.यावेळी . मुश्रीफ म्हणाले की, अनेक शिक्षक बदल्यांसाठी जिल्हा परिषदा आणि मंत्रालयात वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या बदल्यांच्या प्रक्रियेत सुसुत्रता आणण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचा निर्णय घेतला होता. या अभ्यास गटाने आज आपला अहवाल सादर केला असून त्याचा अभ्यास करुन जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात शासनस्तरावरुन लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत सुसुत्रता आणण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेबाबत धोरण निश्चित करण्याचा निर्णय मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केला होता. त्याअनुषंगाने राज्यातील ५ जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अभ्यास गट नेमण्यात आला होता. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील या अभ्यास गटात दिलीप हळदे (रायगड), राहूल कर्डिले (चंद्रपूर), विनय गौडा (नंदुरबार) आणि डॉ. संजय कोलते (उस्मानाबाद) या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता.अभ्यास गटाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अभ्यास गटाने राज्यातील सर्व महसुली विभागांमध्य
...





No comments:
Post a Comment