जे उभे करायचे ते सर्वोत्कृष्टच हा सहकार महर्षींचा ध्यास- डॉ.विश्वनाथ आवड
अकलूज/प्रतिनिधी समाजकारण करीत असताना प्रशासकीय शिस्ती बरोबरच नीटनेटकेपणा आणि सौंदर्यदृष्टीही असली की नंदनवन फुलते याची प्रचिती शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जीवन प्रवासाकडे पाहिल्यानंतर येते. जे उभे करायचे ते सर्वोत्कृष्टच हा ध्यास त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक संस्थेच्या प्रगतीत आणि वास्तूमध्ये दिसून येतो असे मत राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.विश्वनाथ आवड यांनी व्यक्त केले.
सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यालयात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त बोलताना डॉ.आवड बोलत होते.
डॉ.आवड म्हणाले, ज्या भागात सहकाराचे जाळे गतीने विणले जाईल त्या भागातील शेतकरी त्याच गतीने आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल हे सूत्र सहकारमहर्षींनी जाणले होते. शिक्षण, शेतमालाला योग्य बाजारपेठ आणि सहकारी सोसायट्या हे क्षेत्र त्यांनी खुले करण्याची प्रक्रिया त्या काळी गतिमान केली. हे सर्व होत असताना शेतकऱ्यांना खात्रीचा पैसा देणाऱ्या सहकारी साखर कारखानदारीची गरज होती. १९५० च्या दशकात त्यांनी अकलूज परिसरात सहकारी साखर कारखाना उभा करण्याचे स्वप्न पाहिले. ते साकार करण्यासाठी ऊसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी विहीर बागायती असलेल्या सोलापूर जिल्ह्यात त्यांनी विहिरींची संख्या वाढवून ऊसाचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यात ऊस क्षेत्र विकासात राज्यात पहिले येण्याचा मानही मिळविला. तरीही साखर कारखाना उभारणी हा विषय त्या काळात अनेक अडथळ्यांची शर्यत बनला होता. त्या शर्यतीत लोकांच्या पाठिंब्याने ते लीलया यशस्वी झाले. महर्षीं कायम नवनवीन शिकत राहीले, स्वत:शी स्पर्धा करीत राहीले म्हणूनच एकमेकांच्या विश्वासावर अधारीत सहकारी चळवळ या भागामध्ये यशस्वी करू शकले.
यावेळी मुख्याध्यापक देठे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments