जिल्ह्याच्या 349.87 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
सोलापूर, दि. 26 - सोलापूर जिल्ह्यासाठीच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठीच्या 349.87 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीची आज नियोजन भवन येथे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, खा. जयसिध्देश्वर स्वामी, खा. ओमराजे निबांळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, सोलापूर महानगरपालिका आयुक्त दीपक दराडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे व्यासपीठावर उपस्थित होते. सन 2020-21 मधील सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी यंत्रणांनी 667.27 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र नियोजन समितीने 349.87 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे. मात्र जिल्ह्याच्या प्राधान्याच्या योजना लक्षात घेऊन योजनेसाठी 116 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. बैठकीच्या सुरवातीस इतिवृत्तास आणि इतिवृत्ताच्या केलेल्या अनुपालनास मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मिलींद शंभरकर यांनी 2019-20 मधील खर्चाचा आढावा घेतला. जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी 11.46 कोटी व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनेसाठी 26 लाख रुपयांच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली. बैठकीत माळशिरस तालुक्यातील मौजे कचरेवाडी येथील तुळजाभवानी देवस्थान, उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे रानमसले येथील क्षेत्र महिबुब सुबानी बाबा देवस्थान आणि बार्शी येथील भगवंत मंदीरास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली. बैठकीस सर्व आ. बबनदादा शिंदे, भारत भालके, प्रणिती शिंदे, संजय शिंदे, राजेंद्र राऊत, राम सातपुते, यशवंत माने, सचिन कल्याणशेट्टी, रामहरी रुपनवर, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद सदस्य बळीरामकाका साठे, उमेश पाटील, सुभाष माने, नगरसेवक आनंद चंदनशिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments