विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी ‘‘इनोव्हेशन लॅब’’ : रेमया किकुची
सीबीएसई अभ्यासक्रम राबविण्या-या विद्यालयात देशातील पहिली इनोव्हेशन लॅब एस.बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये
पिंपरी (10 डिसेंबर 2019) : विद्यार्थ्यांना सुचणा-या नवीन संकल्पना आणि नाविन्य विचारांना मूर्तरूप देण्यासाठी ‘‘इनोव्हेशन लॅब’’चा उपयोग होईल. लॅबमध्ये काम करीत असताना मिळणारे अनुभव त्यांना भविष्यात कायमस्वरूपी उर्जा देणारे ठरतील. त्यांनी त्यांच्या कल्पकतेचा वापर राष्ट्राच्या विकासाबरोबरच मानवाचे कल्याण व शांततेसाठी करावा, असे मार्गदर्शन जपान येथील लर्निंग सिस्टिमचे मुख्य महाव्यवस्थापक रेमया किकुची यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस.बी. पाटील पब्लिक स्कूल (माध्यमिक महाविद्यालय) येथे उभारण्यात आलेल्या ‘‘इनोव्हेशन लॅब’’चे उद्घाटन किकूची यांच्या हस्ते सोमवारी (दि.9) करण्यात आले. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस. डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, एचसीएल बेंगळूरूचे प्रकाश डेव्हीड, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीष तिवारी, डॉ. संजय लकडे, मुख्याध्यापक संदीप पाटील, प्रसिद्ध लेखक प्रवीण राजपाल, मुख्य पर्यवेक्षिका पद्मावती बंडा आदी उपस्थित होते.
किकूची म्हणाले की, जपानमध्ये 1958 पासून विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्राची सुरुवात, 2002पासून इनोव्हेशन कंपन्या तर 2010 ते 2015 या कालावधीत ई कॉमर्स कंपन्यांच्या स्थापन होऊन व्यवसाय वाढीस सुरुवात झाली. जपानमधील इनोव्हेशन केंद्रातून विद्यार्थ्यांच्या नवीन संकल्पनांना चालना देण्याचे काम केले जाते. त्यासाठी मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य, आर्थिक सहाय्य मिळवून दिले जाते. यातून नवीन व्यवसाय व रोजगार निर्मिती होऊन देशाच्या विकासात हातभार लागत आहे.प्रवीण राजपाल म्हणाले की, बालवयातील मुलांची बुद्धी अधिक तल्लख व नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करीत असते. त्यांच्या मेंदूला चालना देण्याचे काम एस.बी.पाटील विद्यालयातील इनोव्हेशन लॅबमधून करता येईल. विद्यार्थ्यांच्या या नवीन प्रयोग व संशोधनातून तंत्र कुशल शास्त्रज्ञ घडतील, असा विश्वास आहे.
लॅबच्या उभारणीबाबत प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी सांगितले की, सीबीएसई अभ्यासक्रम राबविणा-या विद्यालयांमध्ये अशा प्रकारची इनोव्हेशन लॅब उभारणारी देशातील ही पहिलीच प्रयोगशाळा आहे. त्यासाठी जपान येथील लर्निंग सिस्टिम्स् बरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत लर्निंग सिस्टिमच्या सहकार्याने विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक प्रशिक्षणासाठी जपानला पाठविण्यात येते. यावेळी विद्यार्थ्यांना जपानमध्ये प्रत्यक्ष कंपनीत शिक्षण व काम करण्याचा अनुभव मिळतो.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस. डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
समन्वयक वर्षा देशमुख यांनी प्रास्ताविक केले. स्वागत प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी, सुत्रसंचालन स्वालेहा मुजावर तर आभार निरूपमा काळे यांनी मानले.


No comments:
Post a Comment