Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरीत 2021 च्या जानेवारीत होणार आंतरराष्ट्रीय ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह ; वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. बोधले महाराज यांची सोलापुरात घोषणा

पंढरीत 2021 च्या जानेवारीत होणार आंतरराष्ट्रीय ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह
      वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. बोधले महाराज यांची सोलापुरात घोषणा



सोलापूर, दि. 01 डिसेंबर
                  अखिल  भारतीय वारकरी महामंडळातर्फे पुढील वर्षी 2021  मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या भक्तीपीठाच्या नगरीत म्हणजे भूवैकुंठ पंढरीत 3 जानेवारी ते 10 जानेवारी 2021 या कालावधीत आंतरराष्ट्रीय ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या पारायण सोहळ्यात 1 लाख 25 हजार भाविक प्रत्यक्ष पारायणास बसणार असून अडीच लाखापेक्षाही अधिक भाविक या सोहळ्यात होतील अशी घोषणा अ.भा. वारकरी महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी सोलापुरात झालेल्या राज्यस्तरीय वारकरी मेळाव्यात बोलताना केली.
                  रविवारी सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात अ.भा. वारकरी महामंडळाच्या सोलापूर शाखेतर्फे राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले हे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. मेळाव्यास होटगी मठाचे धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी,  वारकरी फडकरी दिंडी संघटनेचे ह.भ.प. भागवत महाराज चौरे, अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजयराजे भोसले आदींसह वारकरी महामंडळाचे सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष आणि राज्याचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
             पुढे बोलताना ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले म्हणाले, गावोगावी पारायण सोहळे होत असतात. तशाच प्रकारचा हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होईल. या सोहळ्यात भारतातील विविध राज्यांसह परदेशातूनही अनेक भाविक सहभागी होणार आहेत. या पारायण सोहळ्यास प्रत्यक्ष 1 लाख 25 हजार भाविक बसणार आहेत. तर अडीच लाखापेक्षा अधिक भाविक सहभागी होणार आहेत. सोलापूर रोडवरील 65 एकर जमिनीसमोरील ह.भ.प. बोधले महाराज यांच्या मठासमोरील 12 एकर जागेवर हे पारायण होणार आहे. 65 एकर जागेवर पार्किंगची सोय केली जाणार आहे. हा ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह 3 ते 10 जानेवारी 2021 म्हणजे मार्गशिर्ष  4 चतुर्थी ते द्वादशी या कालावधीत होणार आहे. या पारायण सोहळ्यातून संपूर्ण जगभर आपण मानवतेची शिकवण पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. या सोहळ्याच्या तयारीसाठी आता वर्षभर कालावधीत मिळणार आहे. त्यामुळे हा सव्वालाख भाविकांच्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाच्या तयारीसही पुरेसा अवधी मिळणार असल्याचे ह.भ.प. बोधले महाराज म्हणाले.
       पुढचा संदेश देताना ह.भ.प. बोधले महाराज म्हणाले, सर्वक्षेत्रातील सर्व धर्म, पंथांच्या प्रचारकांनी, कार्यकर्त्यांनी या देशातील माणूस सुसंस्कृत करण्यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी अध्यात्मिक आणि वैचारिक ऐक्य साधून हा देश आपण सर्वांनी सुसंस्कृत, बलशाही करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.  वारकरी संप्रदायाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मंडळाकडून काय मिळते या पेक्षा शासनाच्या आहे त्या योजनांमधून आपल्या संप्रदाया बरोबरच समाजातील सर्व घटकांना काय लाभ  मिळू शकतात  याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. असा अभ्यास केल्यास अनेक योजनांचा लाभ मिळतो, असेही त्यांनी सांगितले.
                  अध्यात्मिक शिक्षणाची गरज : डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य
आजच्या शिक्षण पद्धतीत पैसा कसा कमवावा याचे शिक्षण दिले जात आहे. मात्र जीवन कसे जगावे याची शिकवण नाही. त्यासाठी अध्यात्मिक शिक्षण मिळाले पाहिजे. ते देण्याची आपल्यासारख्या महाराज मंडळी, धर्मगुरू, महास्वामी, अशांची जबाबदारी आहे. ती आपण सर्वांनी पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन होटगी मठाचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी या मेळाव्यात बोलताना केले.
                    यावेळी जन्मेजय भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. संजय पवार आणि सुधाकर महाराज इंगळे यांनी केले. पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून आणि हरिनामाचा जयघोष आणि पुंडलिकावरदे हारी विठ्ठलाच्या गजरात मेळाव्याचे उद्‌घाटन झाले. मेळाव्याच्या उद्‌घाटनापूर्वी वारकरी संप्रदायातील महनीय व्यक्ती नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास आणि पंढरपूरचे किसन महाराज टेंभूकर यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली.
ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे राज्य अध्यक्ष
          या मेळाव्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये सोलापूर जिल्हा वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांची वारकरी महामंडळाच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सचिवपदी अण्णा महाराज बोधले यांची निवड करण्यात आली. याशिवाय भारत कोकाटे महाराज आणि रामकृष्ण रगवे महाराज यांची प्रदेश समितीवर  निवड करण्यात आली. याशिवाय विविध जिल्ह्यातील पदाधिकारीही निवडण्यात आले. या सर्वांचा सत्कार डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या हस्ते करण्यात आला. 
Reactions

Post a Comment

0 Comments