लोकमंगलच्या ‘सप्तपदी’ त बांधणार १००
वधू-वरांच्या रेशीमगाठी
रविवारी गोरज मुहूर्तावर संपन्न होणार सर्वधर्मीय
सामुदायिक विवाह सोहळा
वधू-वरांच्या रेशीमगाठी
रविवारी गोरज मुहूर्तावर संपन्न होणार सर्वधर्मीय
सामुदायिक विवाह सोहळा
वरात मार्ग :- हरीभाई देवकरण – रंगभवन – सात रस्ता – कारीगर पेट्रोल पंप – त्रिपुर सुंदरी – गांधी नगर - जुना होटगी नाका – किनारा – आसरा चौक - आसरा पूल – डीमार्ट – भारती विद्यापीठ – विजापूर रोड – आय. टी.आय – कंबर तलाव – शासकीय दुधडेरी - डाक बंगला – संगमेश्वर कॉलेज – जुना एम्प्लॉयमेंट चौक - काळजापूर मारुती – डफरीनचौक – हरीभाई देवकरण.
सोलापूर : केवळ सोलापूरच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात ललामभूत ठरलेल्या लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता म्हणजेच गोरज मुहूर्तावर लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. लोकमंगलने समता निर्माण केलेल्या या ‘सप्तपदी’च्या मंगलमय उपक्रमात सर्वधर्मीय १०० वधू-वरांच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार आहेत. हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात भव्य-दिव्य अशा मंडपात हा सोहळा पार पडणार आहे.
लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे सहकार मंत्री मा. ना. सुभाष (बापू) देशमुख यांनी समाजकारणाचा वसा घेतल्यानंतर त्यांची नाळ गरीब, सामान्य व वंचित वर्गाशी जोडली गेली. आर्थिक पाठबळ नसल्याने ऋण काढून सण साजरे करण्याची ती जुनी परंपरा आणि अन्य चालीरीती ह्या त्यांना या वर्गात प्रकर्षाने दिसून आल्या. हे सारे चित्र बदलून टाकण्याचा निर्धार ना. सुभाष बापुंनी केला आणि त्यातून सर्वधर्मातील गरीब व पिडीत वर्गासाठी सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्याची संकल्पना पुढे आली. गेल्या एक तपात या संकल्पनेचे मूळ इतके घट्ट रुजले आहे कि, त्याचा वेलू हळूहळू गननावरी चालला आहे. यंदा या उपक्रमाचे १४ वे वर्ष असून हा सोहळा ३४ वा आहे. मा. बापूंनी प्रज्वलित केलेल्या या सामाजिक नंदादीपाची ज्योत सदैव तेवत राहिल. ३ लाख ७५ हजार चौरस फुटावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात सोलापूरच्या पंचक्रोशीतील सामन्यांची असणारी उपस्थिती, वऱ्हाडी मंडळींचे भोजन, सनई चौघड्यांचा मंगलमय दणदणाट आणि वधू-वरांची अगदी हौसेने काढली जाणारी मिरवणूक, सामाजिक प्रश्नांवर केले जाणारे प्रबोधन आणि रक्तदान, नेत्रदान व अवयवदान यावर जागृती हे सारे चित्र पाहता या सोहळ्याला आता लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त होत आहे.
या तपपूर्तीत २७२६ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला आहे. यंदाच्याही या सोहळ्यात प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे यासह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी ५ नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य दिले जाणार आहे. वऱ्हाडी मंडळीना सुग्रास भोजन तर आहे, वधूंना मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे दिले जाणार आहेत. विवाह सोहळ्याच्या व्यवस्थापनासाठी सर्व वधू वरांना क्रमांक दिले जातात. कोणत्याही वधू वरांची जात धर्म न दिसता विवाह सोहळ्या दिलेल्या क्रमांकावरच त्यांची ओळख असते. सर्व वधू वरांना प्रत्येकी एक सहायक असे नेमून दिले जाते. वधू-वरांची शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार असून या सोहळ्याची आठवण म्हणून प्रत्येक जोडप्यांना सीडी दिली जाणार आहे. यंदा श्री अरविंद जोशी , वक्ते गणेश शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर मा. सुभाषबापू व फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.
लोकमंगल विवाह सोहळ्याच्या दालनामधून दरवर्षी समजप्रबोधानासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आतापर्यंत सुजन पालकत्व, जलसंधारण, मृदा संवर्धन, उद्योजकता, पर्यावरण, प्रदूषण इ. विविध विषयांना स्पर्श झाला.यामध्ये ग्रामीण वऱ्हाडी मंडाळीचे मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा उद्देश असतो.
सोलापूरचे ब्रॅडिंग करत असताना येथील धार्मिक पर्यटन, खाद्य संस्कुती इ. नंतर ग्रामीण भागातील परंपरेने रुजालेल्या लोकांचे देखील मार्केटिंग करण्याचे गरजेचे आहे.या लोककलेचे बऱ्याचदा धार्मिक विषयांचे स्वरुपात आल्याने लोकाश्रय म्हणून त्यांचे जतन झाले आहे. यात भारुड, बतावणी, वासुदेव, कुरमुड्या, ज्यातीषी, वाघ्यामुरली, जागरण गोंधळ, कलगी तुरा, इ. विविध पारंपारिक लोककला प्रकारचे या वर्षाच्या दालनामध्ये सादरीकरण व प्रदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातील पारंपारिक लोककलावंत हे प्रकार सादर करणार आहेत.
रक्तदान शिबीर-सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून गेल्या आठ वर्षांपासून या सोहळ्यात रक्तदान शिबीर भरवले जाते. आतापर्यंत लोकमंगल समूहातर्फे १०००० रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. त्या मध्ये विवाह सोहळ्या मध्ये एकूण १ हजार ५८७ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. ह्याही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मदतीचा हात-केवळ विवाह लावून दिला म्हणून जबाबदारी संपत नाही. संसारात भांड्याला भांडे लागत असते. कुठेतरी कुरबुर होत असते. पण त्या भांड्याला लगेच हात लावल्यानंतर नाद थांबतो. प्रपंच करावा निटनेटका असा संतांचा उपदेश आहे. त्याचा विचार करून या सोहळ्यातील पती-पत्नीचा वाद होवू नयेत म्हणून प्रबोधन केले जाते. झालाच तर तसे वाद मिटवण्यासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी पुढाकार घेत असतात. त्यामुळे आतापर्यंत या सोहळ्यातील अनेक जोडप्याची ताटातूट होताहोता संसार नेटका झाला आहे. हेही अभिमानाने सांगता येईल. स्त्री भ्रुणहत्या व आत्महत्या रोखण्यासाठी या सोहळ्यातील ज्या जोडप्यांना पहिली कन्यारत्न होईल, त्या मुलीच्या नावे दोन हजार रुपयांची ठेव संयुक्त खात्यावर अठरा वर्षांच्या मुदतीवर ठेवली जाते. आजपर्यंत २७५ मुलींच्या नावे ही ठेव ठेवण्यात आली आहे. या सोहळ्यातील जोडप्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे लोकमंगल परिवारात नोकरी दिली जाते तसेच व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना कमी व्याजदरात कर्जही मिळवून दिले जाते. एकूणच लोकमंगलचे हे औदार्य पाहता हा सोहळा सामाजिक क्षेत्रात एक मापदंड ठरला आहे.
वरातीचे अप्रूप अन सप्तसुरांची झालर – ह्या सोहळ्याचे सोलापूरकरांना मोठे अप्रूप असते. वधू-वरांचा हा कौतुक सोहळा सोलापूरकरांना ‘याची देही, याची डोळा’ पाहता यावा म्हणून दुपारी तीन ते साडेपाच या वेळेत नव दाम्पत्यांची वरात काढली जाते. त्यामुळे वाहतुकीला कुठलाही अडथळा ठरत नाही, हे एक वैशिष्ट्य यानिमित्ताने सांगता येईल. वरात निघाल्यानंतर वऱ्हाडी लोकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची त्यांना मेजवानी दिली जाते. यंदा भारुड, भजनी व गोंधळी गीतांनी नामवंत कलाकार आपली कला पेश करणार आहेत. लोकमंगलच्या वतीने निराधार माता-पित्यांना अन्नपूर्णा हि योजना राबवली जाते. दररोज शहरातील ५०० लाभार्थ्यांना दोन वेळचे जेवण घरपोच मोफत दिले जाते. त्या सर्वांचा या सोहळ्यात सन्मान केला जातो.तसेच या निराधार माता-पित्यांना विवाह सोहळ्याती सन्मान पंगतीचा पहिला मान असतो त्यांच्यासाठी सन्मान पंगत ठेवली जाते. त्यात हे वृद्ध लोक आनंदाने भोजनाचा आस्वाद घेत असतात.
पुष्पवृष्टीने स्वागत - रविवारी सकाळी वधू-वर यांचे मंडपात आगमन होईल तेव्हा पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात येईल. वरातीचे विवाहस्थळी आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात येईल. त्यासाठी नाशिकचे ढोल पथक यांचेही योगदान असणार आहे.
भव्य व्यासपीठाची सजावट –विवाह सोहळा म्हटल्यानंतर भव्य व्यासपीठ असावे लागते. त्याचा विचार करून ७ हजार स्क्वेअर फुटाचे भव्य व्यासपीठ साकारण्यात आले आहे.सध्या सुरु असलेल्या पावसाच्या कारणामुळे कलात्मक सजावट न करता या वर्षी त्यावर एल ई डी स्क्रीन च्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव हा संदेश असणार आहे.
हा विवाह सोहळा लोक सहभागातून मागील १४ वर्षापासून चालत आला आहे. या सोहळ्या मध्ये ३५०० स्वयंसेवक कार्यरत असतात. नम्र आवाहन-कुठलेही कार्य तडीस जाण्यासाठी प्रेरणा आणि सदिच्छा असावी लागते. गेल्या एक तपात सोलापूरकरांच्या पाठींब्यावरच लोकमंगलचा हा जगन्नाथाचा रथ पुढे जात आहे. शहरवासीयांकडून मिळत असलेल्या भरभक्कम पाठबळामुळे आम्हाला या सोहळ्यात कुठलीही कमतरता आतापर्यंत भासलेली नाही व यापुढेही भासणार नाही. तेव्हा सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद द्यावेत असे नम्र आवाहन आम्ही करत आहोत.

No comments:
Post a Comment