प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी माहितीपट, लघुपट स्पर्धेचे आयोजन

सोलापूर- किर्लोस्कर – वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ यांच्या संयुक्त विदयमाने ‘ प्लास्टिक प्रदूषणावर मात करा ‘ या विषयावर विदयापीठस्तरीय लघुपट - माहितीपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सोलापूर जिल्हयातील महाविदयालयात व विदयापीठात कोणत्याही अभ्यासक्रमात शिकणारे विदयार्थी सहभागी होऊ शकतील.
या स्पर्धेत यश मिळविणा-या पहिल्या तीन संघांना व त्यातील सहभागी विदयार्थ्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत अशी माहिती विदयापीठाचे कुलसचिव प्रा. व्ही.बी. घुटे यांनी दिली आहे.
पर्यावरण विषयक जनजागृती घडवून आणण्यासाठी दरवर्षी सोलापूर शहरात किर्लोस्कर – वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाचाही सहभाग असतो. दरवर्षी या महोत्सवात एका महत्वाच्या विषयावर विचार मंथन होत असते. यावर्षी ‘ प्लास्टीक प्रदूषणावर मात करुया ‘ या विषयावर लघुपट – माहितीपट स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या स्पर्धेत विदयापीठाच्या विविध संकुलातील तसेच संलग्न महाविदयालयातील विदयार्थ्यांना आपले लघुपट- माहितीपट सादर करता येतील. या स्पर्धेत प्रथम येणा-या संघास 4000 रुपयांचे प्रथम पारितोषिक, 3000 रुपयांचे व्दितीय तर 2000 रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या तीन पारितोषिक विजेत्यांना महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात पारितोषिके दिली जाणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागावर या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या स्पर्धेत सादर करण्यासाठीचा लघुपट - माहितीपट जास्तीत जास्त 15 मिनिटांच्या कालावधीचा असावा, सदर लगुपट – माहितीपट विदयार्थ्यांनी तयार केलेला असावा. स्पर्धेसाठी माहितीपट पाठविण्याची अंतिम मुदत 14 सप्टेंबर 2019 आहे. या स्पर्धेची नियमावली व अधिक माहितीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर ( 9860091855 ) किंवा किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे सहायक व्यवस्थापक श्री. ऋषिकेश कुलकर्णी ( 9881629594) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments