जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 3, 2026

जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

 जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील महिलांच्या स्वावलंबनाला चालना देण्यासाठी, त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’ला जिल्हा परिषद परिसरात उत्साहात सुरुवात झाली.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड.अमृता वाघे, 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी नाना कांबळे, सचिन जाधव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे मीनाक्षी मडीवळी,दयानंद सरवळे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे यांच्यासह तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

*महोत्सवाच्या उद्घाटनानंतर उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देत महिलांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, त्यांनी स्वामिनी महिला बचत गटाच्या स्टॉलवरून स्वतः विविध उत्पादनांची खरेदी करून महिला उद्योजिकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.*यावेळी त्यांनी बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची माहिती घेतली तसेच ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करावे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी महोत्सवातील सर्व महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची पाहणी *केली.*प्रत्येक बचत गटाच्या महिलांशी संवाद साधत त्यांनी उत्पादनांची निर्मिती, गुणवत्ता, विक्री आणि बाजारपेठ याबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांनी महिला बचत गटांच्या उत्पादनांची गुणवत्ता चांगली असल्याचे नमूद करत, उत्पादनांच्या आकर्षक व दर्जेदार पॅकेजिंगकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. उत्पादन कितीही चांगले असले तरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याचे सादरीकरण, पॅकिंग, ब्रँडिंग आणि दर्जा यांना महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील महोत्सवात उत्पादनांचे पॅकेजिंग अधिक आकर्षक व व्यावसायिक स्वरूपात करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले.

*महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अँड.अमृता वाघे यांनीदेखील बचत गटांच्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या उत्पादनांचे कौतुक केले. महिलांनी केवळ उत्पादन निर्मितीपुरते मर्यादित न राहता विक्री, विपणन आणि उत्पादनांची गुणवत्ता वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.
नागरिकांनी महोत्सवाला भेट देऊन स्थानिक उत्पादनांना द्यावे प्रोत्साहन
रुक्मिणी दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या महोत्सवात महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू व उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. नागरिकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट देऊन महिला बचत गटांकडून वस्तूंची खरेदी करावी आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या प्रवासाला हातभार लावावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages