कोणती संस्था बुडवली ते दाखवा!’; जयकुमार गोरेंना रणजितसिंह मोहिते-पाटलांचे खुले आव्हान
जिल्हा बँकेच्या कारभारावरून विरोधकांना प्रत्युत्तर; ८८७ कोटींच्या कर्जवाटपाच्या ऑडिटचा निर्धार, ‘वाजणार तर शिट्टीच’चा प्रचारसभेत नारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून शेतकरीकेंद्रित कारभाराला नवी दिशा देण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलने व्यक्त केला आहे. सर्व तालुक्यांना कर्जवाटपात समान न्याय, शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि पारदर्शक कारभाराचा अजेंडा मांडत माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले. ‘मी बँकेचा अध्यक्ष असताना माझ्या खासगी संस्थेला एक रुपयाचेही कर्ज दिले नाही. कोणती संस्था बुडवली असेल तर ती दाखवून द्या,’ असे खुले आव्हान त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिले.
रविवारी ऐश्वर्या हॉटेलमधील सभागृहात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलची विचारविनिमय व प्रचार बैठक पार पडली. यावेळी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बँकेच्या भविष्यातील वाटचालीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हा बँकेची निवडणूक वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांऐवजी बँकेचा कारभार, आर्थिक स्थिती आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टिकोनावर लढली गेली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बँकेच्या कर्जवाटपात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समान संधी मिळाली पाहिजे. एकाच तालुक्यात अधिक कर्जवाटप होत असेल तर इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून नवीन योजना राबविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, पॅनलचे उमेदवार अनिकेत देशमुख आणि दत्तात्रय खडतरे यांनी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले. एका विशिष्ट कारखान्याला दिलेल्या कर्जाचा संदर्भ देत ८८७ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाबाबत त्यांनी आक्षेप नोंदवले. या कर्जवाटपाचे ऑडिट करण्याचा निर्धार दत्तात्रय खडतरे यांनी व्यक्त केला. बँकेचा कारभार पारदर्शक ठेवून सभासदांच्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना विरोधी गटातील चार जण आपल्या बाजूने येणार असल्याचा दावाही खडतरे यांनी केला.
माणसे वापरायची नाहीत, मोठी करायची असतात!
पॅनलचे उमेदवार अमोल शिंदे यांनी प्रचारसभेत मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. माणसांचा वापर करून त्यांना बाजूला करण्यापेक्षा त्यांना संधी देऊन उभे करणे आणि मोठे करणे महत्त्वाचे असते, असे सांगत रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अनेकांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याचे त्यांनी नमूद केले.
मोहिते-पाटील यांच्यासोबत प्रचारात फिरताना पॅनलच्या विजयाचा आत्मविश्वास वाढला असल्याचे सांगत अमोल शिंदे यांनी, ‘आमचे ठरले आहे, वाजणार तर शिट्टीच!’ असा ठाम नारा दिला. त्यावर उपस्थित समर्थकाने प्रत्यक्ष शिट्टी वाजवून प्रतिसाद दिला. त्यामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या बैठकीला खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, उमेदवार अमोल शिंदे, अनिकेत देशमुख, दत्तात्रय खडतरे, अस्मिता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, माजी शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, माजी महापौर आरिफ शेख, संजय हेमगड्डी, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, राजू सुपाते आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment