पंढरपुरातील प्रभाग १७ साठी ५ कोटींचा निधी मंजूर! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 23, 2026

पंढरपुरातील प्रभाग १७ साठी ५ कोटींचा निधी मंजूर!

 पंढरपुरातील प्रभाग १७ साठी ५ कोटींचा निधी मंजूर!

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश; रस्त्यांसाठी ३.७० कोटी, शाळा आणि व्यायामशाळेसाठी १.३० कोटींची तरतूद



पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :* पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळणार आहे. या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली शिफारस आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीची दखल घेत निधी उपलब्ध करून दिला असून, याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याची माहिती दिलीप धोत्रे यांनी दिली.

मंजूर निधीपैकी ३ कोटी ७० लाख रुपये प्रभागातील रस्त्यांच्या विकासासाठी, तर १ कोटी ३० लाख रुपये शाळांचे नूतनीकरण, दुरुस्ती आणि व्यायामशाळेच्या उभारणीसाठी खर्च केले जाणार आहेत. यामुळे प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

रस्ते विकासासाठी मंजूर झालेल्या निधीतून रमाई नगरमधील रस्ता, म्हसोबा मंदिर ते दत्ता थोरात यांच्या घरापर्यंतचा रस्ता, सात नंबर शाळा ते नऊ नंबर शाळेपर्यंतचा रस्ता यांसह प्रभागातील एकूण आठ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून नगरपरिषदेच्या सात नंबर शाळेच्या नूतनीकरणासाठी ५० लाख रुपये, नऊ नंबर शाळेसाठी ४० लाख रुपये, तर नगरपरिषदेच्या जागेत व्यायामशाळा उभारण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय शाळांची दुरुस्ती, सुशोभीकरण, पथदिवे आणि अभ्यासिकेच्या बांधकामासह विविध विकासकामांचा प्रस्ताव धोत्रे यांनी शासनाकडे मांडला होता.

प्रभागातील विकासकामांसाठी दिलीप धोत्रे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधी मंजुरीसाठी शिफारस केली. या शिफारशीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने प्रभागातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी मंजुरीचे पत्र स्वीकारण्यात आले.

निवडणुकीच्या काळात माधुरी धोत्रे आणि लोकेश यादव यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना विकासकामांची जी आश्वासने दिली होती, ती आता प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. पाच कोटींच्या निधीतून रस्ते, शैक्षणिक सुविधा आणि क्रीडा सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या निधी मंजुरीबद्दल दिलीप धोत्रे यांनी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. प्रभागातील सर्व विकासकामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी दादा क्षीरसागर, जगदीश लकेरी, बापू खिलारे, दादा घोडके, लक्ष्मण रणदिवे, सुदेश खिलारे, पिंटू गायकवाड, पप्पू बांदपट्टे, दिनेश पांढरे, संतोष वाघमारे, दत्ता थोरात, संतोष गायकवाड, नागेश इंगोले आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages