पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी तपास कामाची दखल घेऊन विशाल पांढरे यांचा गौरव
नातेपुते(कटूसत्य वृत्त):- पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने आरोपीला 'दुर्मिळातील दुर्मिळ' या श्रेणीत मोडणाऱ्या गुन्ह्यासाठी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजसह वैज्ञानिक व तांत्रिक पुराव्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.या प्रकरणाच्या तपासामध्ये सीसीटीव्ही फुटेजचे शास्त्रीय विश्लेषण, वैज्ञानिक अहवाल आणि न्यायालयात सादर करण्यात आलेले तांत्रिक पुरावे हे न्यायदानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले. विशेषतः वैज्ञानिक पुराव्यांच्या अचूक विश्लेषणामुळे प्रकरणाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.
या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या हस्ते वैज्ञानिक अधिकारी (सायबर क्राईम), प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, गणेशखिंड, पुणे येथील श्री. विशाल रंजना सावळा-पांढरे साहेब यांना विशेष प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.गुन्हे तपासामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि डिजिटल पुराव्यांचे महत्त्व या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. न्यायप्रक्रियेत वैज्ञानिक पुरावे किती निर्णायक ठरू शकतात, याचे हे प्रकरण महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले आहे.कर्तव्यनिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तपासकार्यातील मोलाचे योगदान याबद्दल विशाल सावळा-पांढरे साहेब यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment