आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हिमायतनगर तालुक्यात आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी निर्देश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 3, 2026

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हिमायतनगर तालुक्यात आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी निर्देश

 आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हिमायतनगर तालुक्यात आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी निर्देश
नांदेड(कटूसत्य वृत्त):-ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, तत्पर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून, आरोग्य यंत्रणेने गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून सेवा द्याव्यात, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज हिमायतनगर तालुक्यातील पाहणी दौऱ्यादरम्यान दिले.
‘आरोग्य संवाद यात्रा 2026’ अंतर्गत आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी हिमायतनगर तालुक्यातील दरेगाव तांडा, वाळकेवाडी, दुधड, सरसम आणि हिमायतनगर येथील विविध आरोग्य संस्थांना भेटी देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थ, रुग्ण, आरोग्य कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या.
दरेगाव तांड्यात नागरिकांशी संवाद ; घरोघरी आरोग्य सेवा देण्याच्या सूचनाहिमायतनगर तालुक्यातील दरेगाव तांडा येथे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी दरेगाव तांडा येथील शेती पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनतर त्यांनी गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधून दुष्काळी परिस्थिती, स्थानिक अडचणी आणि आरोग्यविषयक समस्यांची माहिती घेतली. गावातील प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सेविका व आरोग्य सेवकांनी पोहोचून आवश्यक आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन द्यावे. कोणताही नागरिक शासकीय आरोग्य सेवा व योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
वाळकेवाडी येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन
वाळकेवाडी येथील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिवंगत राजू ढाले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गरजू नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना व सेवा पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
दुधड उपकेंद्र व सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी
आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी दुधड येथील आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन तेथील उपलब्ध सुविधा, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामकाज आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली. त्यानंतर सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. केंद्रात उपलब्ध असलेल्या ईसीजी तपासणी सुविधेबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आरोग्य सेवांचा आढावा घेतला.
हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश
हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी रुग्ण, नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार, आवश्यक औषधे आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रुग्णसेवेत कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
‘आरोग्य संवाद यात्रा 2026’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी, नागरिकांशी थेट संवाद आणि आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण यावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करून प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार आणि आरोग्यविषयक सुविधा पोहोचविण्याच्या शासनाच्या भूमिकेला या दौऱ्यामुळे बळ मिळाले आहे. या दौऱ्यात दरेगाव तांडा व वाळकेवाडी येथील नागरिकांना दिवाळीनिमित्त शिधा वाटपही करण्यात आले.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी खासदार नागेश पाटील-आष्टीकर, आमदार बाबुराव कदम-कोहळीकर, आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, आरोग्य सेवेचे संचालक (शहरी) डॉ. गोविंद चौधरी, संचालक (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय नवले यांच्यासह स्थानिक आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages