नव्या सिंथेटिक ट्रॅकवर सराव करणारे खेळाडू देशासाठी पदके जिंकतील– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 3, 2026

नव्या सिंथेटिक ट्रॅकवर सराव करणारे खेळाडू देशासाठी पदके जिंकतील– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नव्या सिंथेटिक ट्रॅकवर सराव करणारे खेळाडू देशासाठी पदके जिंकतील– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर(कटूसत्य वृत्त):- विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅकवर सराव करणाऱ्या मुला-मुलींमधून भविष्यात भारतासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल मैदान, स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) व युवा वसतिगृहाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुंदर सिंथेटिक ट्रॅक व फ्लड लाईट्सची सुविधा उपलब्ध झाली आहे. या मैदानावर सराव करणारा एखादा मुलगा किंवा मुलगी भविष्यात भारतासाठी पदक मिळवेल, असा मला विश्वास आहे. या क्रीडासुविधांच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या विभागीय क्रीडा संकुल समिती व क्रीडा विभागाचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, क्रीडाप्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.
१२ कोटी ७५ लाखांत सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल मैदान
विभागीय क्रीडा संकुलात १२ कोटी ७५ लाख रुपये खर्चून आठ लेनचा ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक व नैसर्गिक हिरवळीचे फुटबॉल मैदान विकसित करण्यात आले आहे. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी दहा लेन उपलब्ध आहेत. या सुविधांमुळे धावणे, अडथळा शर्यती, रिले, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक यांसारख्या विविध क्रीडाप्रकारांचा सराव व स्पर्धा घेता येणार आहेत. फुटबॉल मैदानावर आधुनिक स्प्रिंकलर सिंचन यंत्रणाही बसविण्यात आली आहे.
दहा हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियममध्ये चार उंच मास्टवर प्रत्येकी २२ याप्रमाणे एकूण ८८ दिव्यांची प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ११ कोटी ६७ लाख ४२ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. फ्लड लाईट्समुळे सायंकाळच्या वेळेतही खेळाडूंना सराव व स्पर्धांचे आयोजन करता येणार आहे.
खेळाडूंच्या निवासासाठी चार कोटी रुपयांच्या निधीतून युवा वसतिगृह उभारण्यात आले आहे. यामध्ये १६ खोल्या, परिषद सभागृह, स्वयंपाकगृह, भोजनगृह, ग्रंथालय व वाचन कक्षाच्या सुविधा उपलब्ध आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनी धावण्याच्या स्पर्धांना प्रारंभ
लोकार्पणानंतर नूतन सिंथेटिक ट्रॅकवर मुली व मुलांच्या १०० मीटर प्रदर्शनी धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लॅप देऊन दोन्ही स्पर्धांना प्रारंभ केला. राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांत सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्यासमवेत छायाचित्रही काढले.
यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना सिंथेटिक ट्रॅकची प्रतिकृती, अजिंठा-वेरूळ शिल्प असलेले सन्मानचिन्ह व त्यांच्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवर आधारित ‘डीएफ’ क्रीडा साहित्य संच भेट देण्यात आला.नव्या सुविधांमुळे मराठवाड्यातील खेळाडूंना दर्जेदार सराव, प्रशिक्षण व निवासाची व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध झाली असून, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनालाही चालना मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages