मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३४ वातानुकूलित ई-बसचे लोकार्पण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 3, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३४ वातानुकूलित ई-बसचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३४ वातानुकूलित ई-बसचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर (कटूसत्य वृत्त):-शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आरामदायी व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करण्यात आलेल्या ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या बससेवेसह महानगरपालिकेच्या विविध विकासप्रकल्पांच्या लोकार्पण शिलाफलकांचे अनावरण करण्यात आले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., महापौर समीर राजूरकर, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शहरवासीयांना आधुनिक व पर्यावरणपूरक बससेवा
महानगरपालिकेच्या शहर बससेवेत नव्याने समाविष्ट झालेल्या या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सोमवार, दि. २ नोव्हेंबरपासून या बस प्रवासी सेवेत दाखल होणार असून शहरातील विविध मार्गांवर त्यांचे संचालन करण्यात येणार आहे.
या बस नऊ मीटर लांबीच्या असून प्रत्येकी ३२ प्रवासी आसनांची व्यवस्था आहे. जीपीएस आधारित बस ट्रॅकिंग, डिजिटल तिकीट प्रणाली, आधुनिक ब्रेकिंग यंत्रणा व जलद चार्जिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक बसमुळे इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यासह शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे.
महानगरपालिकेने पीएम ई-बस योजनेअंतर्गत आणखी १०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.
ई-व्ही चार्जिंग स्टेशन व सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कॅनॉट गार्डन व बाबा पेट्रोल पंपाजवळील भगवान महावीर उड्डाणपुलाखाली ई-व्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शहरात भविष्यात आणखी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन विकसित करण्याचे नियोजन आहे.
तसेच सिद्धार्थ उद्यान वाहनतळावर १०० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वीजबचतीसह स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना मिळणार आहे.
मिटमिटा येथील आधुनिक शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
महानगरपालिकेच्या मिटमिटा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.
देवगिरी व्हॅली परिसरात उभारण्यात आलेल्या या शाळेत २४ वर्गखोल्या, ग्रंथालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण सुविधा, स्मार्ट वर्गखोल्या व क्रीडांगण उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा या इमारतीत निर्माण करण्यात आल्या आहेत. मे. तापडिया कन्स्ट्रक्शन यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शाळेचे बांधकाम पूर्ण केले आहे.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५९ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश
या कार्यक्रमात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५९ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. महापौर समीर राजूरकर व महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला.
शहरातील सार्वजनिक वाहतूक, स्वच्छ ऊर्जा व शिक्षण क्षेत्रातील या प्रकल्पांमुळे नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासह पर्यावरणपूरक व शाश्वत शहरी विकासाला चालना मिळणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages