जैन समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री ॲड. आशिष शेलार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 3, 2026

जैन समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री ॲड. आशिष शेलार

 जैन समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री ॲड. आशिष शेलार

  • मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जैन समाजाकडून ५१ लाख रुपयांची मदत

मुंबई(कटूसत्य वृत्त):- जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनामार्फत व्याजमुक्त कर्ज, नवउद्योजकता आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच जैन समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल. प्राकृत, संस्कृत आणि मराठी साहित्याच्या देवाणघेवाणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासही प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

घाटकोपर येथील आराध्य भक्ती पार्क येथे जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या वतीने आयोजित कर्ज वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, प्रमुख संयोजक पराग शाह, महामंडळाचे समन्वयक संदीप भंडारी, जैन मुनी नम्र मुनी महाराज, साध्वी तसेच जैन समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, जैन धर्मातील अहिंसा, जीवदया, समर्पण आणि विश्वकल्याणाची शिकवण समाजासाठी मार्गदर्शक आहे. जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. व्याजमुक्त कर्जाच्या माध्यमातून नवउद्योजकता, नावीन्यपूर्ण उद्योग आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यात येईल. जैन समाजाच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून त्यास मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

राज्यातील जैन परंपरेशी संबंधित धार्मिक स्थळे, आध्यात्मिक केंद्रे आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल. तसेच प्राकृत, संस्कृत आणि मराठी साहित्याच्या परस्पर देवाणघेवाणीला आणि साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

जैन समाजाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा– कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जैन समाजाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने किमान १०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करून शासनाच्या मदतकार्यात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. जैन धर्माची परंपरा प्राचीन असून भारतीय संस्कृतीशी तिचे अतूट नाते आहे. व्यापक सांस्कृतिक एकात्मतेच्या भावनेतून समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे वाटचाल करावी, असेही त्यांनी नमूद केले.

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळामार्फत शिष्यवृत्ती, विधवा महिलांना व्यवसायासाठी अनुदान, पाठशाळांचे आधुनिकीकरण तसेच विहारधाम उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. यावेळी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.

५११ लाभार्थ्यांना ५१ कोटी रुपयांचे कर्जवाटप

कार्यक्रमात शेठ वालचंद हिराचंद स्वयंरोजगार कर्ज व्याज परतावा योजना, कर्मवीर भाऊराव पाटील उच्च शिक्षण कर्ज योजना आणि महिला बचत गट कर्ज योजना या तीन योजना अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कर्जवितरणाचे धनादेश प्रदान करण्यात आले. या योजनांच्या पहिल्या टप्प्यात एकूण ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.

महामंडळाचे समन्वयक संदीप भंडारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी जैन मुनी नम्र मुनी महाराज, जैन साध्वी तसेच अन्य मुनींनी उपस्थितांना आशीर्वचन दिले. समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages