तीन दिवसांच्या उपोषणाने प्रशासनाचे धाबे दणाणले! तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने पाटबंधारे विभागाची धावपळ; सापटणे तलावात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 5, 2026

तीन दिवसांच्या उपोषणाने प्रशासनाचे धाबे दणाणले! तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने पाटबंधारे विभागाची धावपळ; सापटणे तलावात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन

 तीन दिवसांच्या उपोषणाने प्रशासनाचे धाबे दणाणले! तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने पाटबंधारे विभागाची धावपळ; सापटणे तलावात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन




वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तिघांवर सलाईनद्वारे उपचार; माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंडू नाना ढवळे यांची मध्यस्थी, उपोषण स्थगित करण्याचे प्रशासनाचे आवाहन

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-   सापटणे तलावात उजनीचे पाणी सोडावे, या मागणीसाठी सापटणे, वेणगाव आणि तांबवे येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा बुधवारी तिसरा दिवस होता. सलग तीन दिवसांच्या उपोषणामुळे दहा उपोषणकर्त्यांपैकी लहू भानुदास ढवळे, मारुती सदाशिव कुबेर आणि हिरालाल घोडके या तिघांची प्रकृती खालावली. टेंभुर्णी येथील वैद्यकीय अधिकारी माळी मॅडम यांनी आंदोलनस्थळी धाव घेत तिघांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांना सलाईन लावून उपचार सुरू करण्यात आले. एका उपोषणकर्त्याचा रक्तदाब कमी-जास्त होत असल्याने प्रकृती अधिक खालावण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाटबंधारे विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपसभापती तुकाराम बंडू नाना ढवळे यांनी मध्यस्थी करत उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीचा धोका लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. अखेर भीमा पाटबंधारे उपविभाग, टेंभुर्णीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल घेत सापटणे तलावात पाणी सोडण्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले. यामुळे आंदोलनस्थळी निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.

पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या लेखी पत्रात सापटणे तलावात पाणी सोडण्याबाबत आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. सापटणे पाणी वापर संस्था आणि शेतकऱ्यांनी यापूर्वी १४, २८ आणि ३० ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्यासंदर्भात निवेदने दिली होती. सध्या परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

उजनी धरणाच्या माढा उपसा सिंचन योजनेतून १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान सापटणे तलावात पाणी सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही तलावात पाणी सोडण्याची मागणी कायम होती. याच मागणीसाठी २ नोव्हेंबरपासून दहा शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. आगामी रब्बी हंगामाच्या पाणी आवर्तनाबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होणार असून, सापटणे तलावात लवकरात लवकर पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येईल. तसेच उपलब्ध कालावधीतही काही दिवस पाणी सोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन विभागाने दिले आहे.

उपोषण स्थगित करण्यासाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तसेच पाटबंधारे विभागाचे उपअभियंता तुंबळ यांनीही प्रयत्न केले. यावेळी उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ माजी उपसभापती तुकाराम बंडू नाना ढवळे, राजाभाऊ ढवळे, दत्ताभाऊ ढवळे, आप्पा ढवळे, जयसिंग ढवळे, संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप, नानासाहेब ढवळे, राजेंद्र ढवळे, बाळासाहेब ढवळे (फिटर महाराज), आनंद ढवळे, देवेंद्र ढवळे आदी उपस्थित होते.

चौकट......लेखी आश्वासन मिळाले असले तरी सापटणे तलावात प्रत्यक्ष पाणी कधी सोडले जाणार, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर प्रशासनाने दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरतो का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages