१० नोव्हेंबरला ३६७ वा छत्रपती शिवाजी महाराज शौर्य दिवस उत्साहात साजरा करा!
‘एक दिवा छत्रपतींसाठी’ उपक्रम राबविण्याचे छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ, सोलापूरचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय शौर्याची, पराक्रमाची आणि स्वराज्य रक्षणासाठी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची आठवण जागविण्यासाठी येत्या १० नोव्हेंबर रोजी ३६७ वा शौर्य दिवस मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
१० नोव्हेंबर १६५९ हा स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. स्वराज्यावर चालून आलेल्या बलाढ्य अफझलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी धैर्याने आणि युद्धकौशल्याने सामना केला. या ऐतिहासिक संघर्षात अफझलखानाचा वध करून महाराजांनी स्वराज्यावरील मोठे संकट परतवून लावले. या पराक्रमाने स्वराज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेला अध्याय निर्माण केला. त्या ऐतिहासिक शौर्याची आठवण म्हणून १० नोव्हेंबर रोजी शौर्य दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निमित्ताने ‘एक दिवा छत्रपतींसाठी’ हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक शिवप्रेमी, शिवभक्त आणि नागरिकांनी आपल्या घरासमोर, अंगणात किंवा देवघरात एक दिवा प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला, त्यागाला आणि स्वराज्याच्या विचारांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य हे केवळ इतिहासातील एक पर्व नसून ते स्वाभिमान, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, स्त्रीसन्मान, सर्वधर्मसमभाव आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराची प्रेरणा आहे. महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि शिवइतिहासाचा अभिमान प्रत्येकाच्या मनात जागविणे ही काळाची गरज आहे.
एक दिवा घराघरात पेटू द्या, शिवरायांच्या पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या विचारांचा प्रकाश मनामनात पोहोचू द्या! १० नोव्हेंबरचा शौर्य दिवस सर्वांनी एकजुटीने, उत्साहाने आणि शिवमय वातावरणात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी दास शेळके, बाबा बाबरे, सतीश कुदळे, शेखर फंड, गणेश इंगळे, गणेश शिंदे, निरंजन नवगिरे, गणेश गवळी आणि निरंजन बोध्दूल आदी उपस्थित होते.
🚩 एक दिवा छत्रपतींसाठी... एक संकल्प स्वराज्यासाठी! 🚩
जय भवानी! जय शिवाजी!
छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर

No comments:
Post a Comment