व्हॉलीबॉल स्पर्धेत SVS कॉलेज ऑफ फार्मसीला उपविजेतेपद
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- लाखेवाडी येथील जय भवानी गड विकास प्रतिष्ठानच्या विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत एस.व्ही.एस. कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, टेंभुर्णीच्या संघाने दमदार सांघिक कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एस.व्ही.एस. संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातील योगदानाचीही विशेष दखल घेण्यात आली.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एस.व्ही.एस. संघाने स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूरच्या संघाचा २४-१२ अशा फरकाने पराभव करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर अनेकांत एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी, बारामतीच्या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १९-१२ असा विजय मिळवत संघाने पुढील फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीतील सामन्यात एस.व्ही.एस. कॉलेज ऑफ फार्मसीने यजमान विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीच्या संघावर १५-१० अशी मात करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूरच्या संघाविरुद्ध एस.व्ही.एस. संघाने अत्यंत चुरशीचा व थरारक सामना केला. दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, अंतिम सामन्यातील कडव्या संघर्षानंतर एस.व्ही.एस. संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एस.व्ही.एस. महाविद्यालयाच्या संघाचा कर्णधार सुरज बारवे यांना त्यांच्या उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीबद्दल ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच उपविजेतेपद पटकावलेल्या एस.व्ही.एस. संघाला चषक व ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
संघाच्या या यशाबद्दल करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयमामा शिंदे, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी एस.व्ही.एस. महाविद्यालयाच्या संघाला क्रीडा विभाग प्रमुख प्रा. ओंकार जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधनाभिमुख उपक्रमांसोबतच क्रीडा क्षेत्रातही दमदार वाटचाल सुरू असल्याचे दिसून आले.

No comments:
Post a Comment