‘विकसित भारत’चा संकल्प घेत करमाळ्यात भाजपाची भव्य पदयात्रा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
करमाळा (कटूसत्य वृत्त):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या वतीने करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ तसेच भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री देवीचामाळ येथील अथर्व मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. तसेच पदयात्रेलाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाषबापू देशमुख आणि विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्त्यांना केलेल्या संबोधनाचे प्रक्षेपण करण्यात आले.
‘विकसित भारत संकल्प सभे’दरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विकसित भारताच्या संकल्पाची सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘सेवा ज्योती अभियानाचे’ प्रज्वलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन करत सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश या अभियानातून देण्यात आला.
यावेळी आमदार सुभाषबापू देशमुख आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले. त्यांनी विकसित भारताच्या संकल्पासाठी संघटनात्मक पातळीवर सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी करमाळा तालुक्यातील पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, रणजीतभैया शिंदे, जिल्हा परिषद गटनेते रश्मीदिदी बागल, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, माढा पंचायत समितीचे सभापती पंडितकाका देशमुख, करमाळा पंचायत समितीच्या सभापती पूजाताई ढेरे, सांगोला पंचायत समितीच्या सभापती पुनमताई इंगवले, जिल्हा सरचिटणीस सचिनजी शिंदे, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपालीताई लठ्ठे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरजाताई बोबडे यांच्यासह सोलापूर ग्रामीण पश्चिममधील विविध मंडलांचे अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमाळ्यातील या कार्यक्रमातून भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची संघटनात्मक एकजूट आणि विविध सेवा उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. ‘सेवा, संकल्प आणि विकसित भारत’ या भावनेतून कार्यक्रम उत्साहात पार पडला.

No comments:
Post a Comment