आमदार, खासदार हो ! , आटपाडीतल्या अतिक्रमण विरोधात आवाज उठवा !! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 15, 2026

आमदार, खासदार हो ! , आटपाडीतल्या अतिक्रमण विरोधात आवाज उठवा !!

 आमदार, खासदार हो ! , आटपाडीतल्या अतिक्रमण विरोधात आवाज उठवा !!





आटपाडी (कटूसत्य वृत्त):-   अधिकारी, पदाधिकारी यांच्या अप्रत्यक्षातील मेहरबानीने वाढीस लागलेले अब्जो रुपये किंमतीच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविणेसाठी  राज्यातील आणि विशेषत : सांगली जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी जोरदार आवाज उठवावा . असे आवाहन आटपाडीचे सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी लोकप्रतिनिधींना उद्देशुन केले आहे .
          आटपाडीच्या बाजार तळाच्या ओढापात्र ते धांडोर ओढा पात्रा पर्यंतच्या आटपाडी - दिघंची रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अनेक ठिकाणच्या शासकीय जागांवर आणि देवस्थान इनाम वर्ग - ३ च्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाने आटपाडीतील अतिक्रमणाचा कळस गाठला गेला आहे . शासकीय जागांचा आणि देवस्थान इनाम वर्ग - ३ च्या जागेचे रेकॉर्ड शासनाच्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असताना जबाबदार अधिकारी मुग गिळून गप्प का आहेत . हा प्रश्न आहे . बांधकामाची परवानगी न घेता शासकीय जागांवर अनेकांनी अनेक मजली बांधकाम बिनधास्तपणे करीत शासनाच्या तोंडावर सणसणीत चपराक मारली आहे . सुमारे ३ एकर इतक्या देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जागे वरील प्रचंड अतिक्रमणाला शासकीय अधिकाऱ्यांची साथ सोबत लाभल्यानेच हे अघटीत घडल्याचे श्री . विठ्ठलांचे भक्त खाजगीत बोलत असतात .
          आटपाडी - दिघंची रोड लगतच्या दोन्ही कबरस्थान  ते धांडोर ओढ्या पर्यतच्या काही सर्व्हे नंबर च्या नकाशात जवळ जवळ ७० टक्के क्षेत्र शासकीय मालकीचे असल्याचे आज ही दाखवते . मग या विरोधात अधिकारी का कारवाई करीत नाहीत . अतिक्रमण धारकांकडून या अधिकाऱ्यांचे खिसे गरम केले जातात का ? याची गांभीर्याने आणि अतितातडीने चौकशी होणे गरजेचे आहे .
          आटपाडी तलावापासून आटपाडी शहराकडे झेपावणाऱ्या दोन्ही ओढ्यातील अतिक्रमणे तातडीने काढणे अत्यंत महत्वाचे आहे . ३ महिन्यात मोजणी करून ओढ्याच्या दुतर्फाच्या हद्दी निश्चित करणेचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो . हे देवच जाणे . अतितातडीच्या मोजणीसाठी पैसे भरून अनेक ठिकाणच्या मोजणीसाठी वर्ष वर्ष विलंब करणाऱ्यांकडून पारदर्शक आणि तातडीने मोजणी होण्यासाठी सर्वोत्तम ठरणाऱ्या निमताना मोजणीचाच मोजणी प्रकार ओढा पात्रातील मोजणीसाठी वापरला गेला पाहिजे .
          आटपाडीचे एस . टी . स्टॅन्ड ते आटपाडी बाजार पटांगण दरम्यानच्या मुळ आटपाडी गावच्या संरक्षणासाठीच्या संरक्षक तटबंदीच्या अंदाजे ७ रुंदीच्या आणि सुमारे दीड किमी अंतराच्या भिंतीला ओलांडून १० ते २५ फुट बाहेर येत अनेकांनी आपली प्रचंड बांधकामे केली आहेत . हे गावठाण नकाशाच्या सीट वरून दिसून येते . पण हे बघतो कोण ? आटपाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी असोत किंवा तालुक्याचे तहसीलदार असोत किंवा विभागाचे प्रांताधिकारी असोत . यापैकी कोणी या अतिक्रमणां बाबतीत गांभीर्याने दखल घेतील असे आज अखेरच्या त्यांच्या पावित्र्यावरून वाटत नाही . आटपाडीच्या ओढ्याला अनेक वेळा महापूर आला आलेला आहे . महापुराच्या पाण्याने ग्रामपंचायतीच्या आणि आताच्या नगरपंचायत इमारतीच्या पाठीमागील काळा मारुतीच्या पायऱ्या बुडल्या होत्या . तर दुसऱ्या टोकाच्या पाण्यात ओढ्याकाठाची दोन्ही कबरस्थाने पाण्याखाली गेली होती . ही पुर रेषेची वस्तुस्थिती असताना पाव ओढा पात्रात संरक्षक भिंत उभारण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांने या भिंतीच्या मागे पुर रेषा असल्याचा अभिप्राय दिला असेल तर त्याची गांभीर्याने चौकशी करून खोटा अहवाल देणारावर कडक कारवाई होणे अभिप्रेत आहे . मरिमाता मंदिर ते उत्तरेश्वर मंदिरच्या बाजार तळावरील पुर रेषेत येणाऱ्या शासकीय जागेवरील अनेक इमारती गाळ्यांची रितसर शासकीय परवानगीनेच उभारणी झाली आहे का ? किंवा अनाधिकाराने अतिक्रमण करीत बाजारतळ व्यापला गेला आहे का हे ही राज्याच्या उच्च पदस्थ अधिकारी महोदयांच्या माध्यमातील पथकाकडून चिकित्सा होणे अत्यंत गरजेचे आहे .
          राज्यातील आमदार, खासदार महोदयांनी आणि विशेषतः सांगली जिल्ह्यातील आमदार, खासदार महोदयांनी विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार आवाज उठविल्यास आणि या अतिक्रमण वाढीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्या अधिकारी - पदाधिकाऱ्यांच्या बडतर्फीसाठी आग्रह धरल्यासच सुस्तावलेली शासन व्यवस्था जागी होईल . ओढा पात्रातले अतिक्रमण, अतिक्रमण ठरू नये म्हणून काही मान्यवर ओढा पात्राच्या जागेचा ७ / १२ बनविण्यासाठी शासनाकडे आग्रही असल्याची चर्चा धनदांडग्या, रानदांडग्या, जातदांडग्या अतिक्रमण धारकांत सुरू आहे . असा होऊ पाहणारा प्रकार रोखला जावा . आणि अतिक्रमण वाढीस लावणाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे कठोर कारवाई झाली पाहिजे . असेही सादिक खाटीक यांनी शेवटी म्हंटले आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages