मुंबई नागपाडा जिमखाना ठरला "उद्योग महर्षि" चषकाचा मानकरी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- येथील उदयसिंह क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेत मुंबईच्या नागपाडा जिमखाना संघाने आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर अजिंक्यपद पटकावले. अत्यंत रोमहर्षक आणि अटीतटीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात नागपाडा जिमखाना संघाने नेक्सस नांदेड संघावर ९४ विरुद्ध ८६ अशा ८ गुणांच्या फरकाने मात करत 'उद्योग महर्षी चषका'वर आपले नाव कोरले.
उद्योग महर्षी स्व. उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात २ ते ४ ऑक्टोबर दरम्यान या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. देशभरातील नामांकित १६ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
उपांत्य फेरीचा संग्राम: सकाळच्या सत्रात पार पडलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात नेक्सस नांदेड संघाने एस.के.बी.ए. पुणे संघाचा ७१-५२ (१९ गुणांनी) असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात नागपाडा मुंबईने जैन युनिव्हर्सिटी बंगळुरू संघाला ५६-५२ (४ गुणांनी) असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामना आणि उपविजेतेपद: सायंकाळच्या सत्रात प्रेक्षकांच्या उकळत्या उत्साहात नागपाडा मुंबई विरुद्ध नेक्सस नांदेड असा अंतिम सामना रंगला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली, मात्र मोक्याच्या क्षणी नागपाडा जिमखानाने ८ गुणांची आघाडी घेत ९४-८६ अशा फरकाने ऐतिहासिक विजय
स्पर्धेतील विजेत्या संघांना महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते रोख रक्कमा आणि चषक देऊन गौरविण्या आले:
प्रथम क्रमांक (विजेता): नागपाडा जिमखाना, मुंबई — ₹७१,००० व चषक
द्वितीय क्रमांक (उपविजेता): नेक्सस नांदेड — ₹५१,००० व चषक
तृतीय क्रमांक: एस.के.बी.ए. पुणे (बंगळुरूला ५६-५१ असे ५ गुणांनी हरवून) — ₹३१,००० व चषक
चतुर्थ क्रमांक: जैन युनिव्हर्सिटी, बंगळुरू — ₹२१,००० व चषक
या पारितोषिक वितरण सोहळ्याला मदनसिंह मोहिते-पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, अकलूजच्या नगराध्यक्षा रेश्मा अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, देवन्या मोहिते-पाटील, सर्व सन्माननीय नगरसेवक आणि मोठ्या संख्येने क्रीडारसिकांची उपस्थिती लाभली होती.

No comments:
Post a Comment