राजीव गांधी सानुग्रह अपघात अनुदान योजनेतून १९ विद्यार्थ्यांच्या पालकांना डीडीचे वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे त्यांना दुखापत झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने राजीव गांधी सानुग्रह अपघात अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सन २०२६-२७ मधील १९ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण विभागातील योजना कार्यालयामार्फत मंजूर करण्यात आलेल्या या आर्थिक मदतीचे डीडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना वितरित करण्यात आले.
योजनेनुसार अपघाती मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना दीड लाख रुपयांपर्यंत, तर अपघातामुळे दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते. त्यामुळे अपघातासारख्या संकटाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना उपचाराचा खर्च तसेच इतर आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी काही प्रमाणात आधार मिळतो.
जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या प्रकरणांची कार्यवाही पूर्ण करून मंजूर झालेल्या अनुदानाचे डीडी पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. शासनाच्या या मदतीमुळे संकटाच्या काळात संबंधित कुटुंबीयांना आर्थिक हातभार मिळाला.
यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) सुजित शिंदे, उपशिक्षणाधिकारी (योजना) अर्चना जनबंधू, पांडुरंग घोगरे यांच्यासह शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment