सांगोला तालुक्यात पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात; सरसकट पंचनामे करा-चेतनसिंह केदार सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 2, 2026

सांगोला तालुक्यात पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात; सरसकट पंचनामे करा-चेतनसिंह केदार सावंत

 सांगोला तालुक्यात पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात; सरसकट पंचनामे करा-चेतनसिंह केदार सावंत



 

सांगोला (कटूसत्य वृत्त):- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ करपलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सांगोला तालुक्यात आजपर्यंत पुरेसा पाऊस झालेला नसल्याने शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पिकांचे नुकसान, उत्पादनातील घट आणि वाढता शेतीचा खर्च यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी अधिक गंभीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीपिकांचे सरसकट पंचनामे करून एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ तातडीने मिळावा अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.

सांगोला तालुक्यात पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना पिकांची पेरणी करता आलेली नाही. पाऊस पडेल या आशेवर मशागतीसाठी बँका व खासगी सावकारांकडून कर्ज घेतले; मात्र पाऊस न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी ठाम भूमिका जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी मांडली.

“शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात प्रशासनाने कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचून नुकसानीची पाहणी करणे गरजेचे आहे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी पंचनामे सरसकट आणि तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्याबरोबरच पंचनामे पूर्ण होईपर्यंत आणि पात्र शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages