जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 1, 2026

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन

 जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वांमधील अनुच्छेद ३९ (क) व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सुस्थितीसाठी तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे घालविता यावा, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे तसेच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, यासाठी राज्य शासनाने ९ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वसमावेशक धोरण निर्गमित केले आहे.
या धोरणातील तरतुदीनुसार दरवर्षी १ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ (International Day of Older Persons) म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृतीपर व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वृत्तपत्रांमध्ये जनजागृतीपर जाहिराती प्रसिद्ध करणे, सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, आरोग्य शिबिरे, चर्चासत्रे व परिसंवाद आयोजित करावेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार व गौरव करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले विविध कायदे व शासनाच्या योजना, त्यांचे हक्क, उपलब्ध सोयी-सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या हेल्पलाईन क्रमांक १४५६७ याबाबत व्यापक जनजागृती करण्यात यावी. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, सुरक्षितता व कल्याण याबाबत समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण श्रीमती सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages