‘जन आरोग्य संवाद यात्रे’च्या नियोजनाचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्याकडून आढावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘जन आरोग्य संवाद यात्रे’च्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील पूर्वतयारी व नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद, सोलापूर येथे आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, आरबीएसके नोडल अधिकारी डॉ. इरफान सय्यद, जिल्हा सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार, एम अँड एनई समन्वयक अरुण खडके, एनक्यूएएस प्रमुख निखिल फटाटे, सर्व कार्यक्रम समन्वयक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सार्वजनिक आरोग्य परिचारिका उपस्थित होत्या.
आरोग्य संस्थांची प्रत्यक्ष पाहणी आणि लाभार्थ्यांशी संवाद
सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या प्रस्तावित जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने या यात्रेचे नियोजन करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान आरोग्य संस्थांची प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्य सेवांची उपलब्धता, गुणवत्ता आणि अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच विविध आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व अनुभव जाणून घेण्यावर भर देण्यात येणार आहे.
समित्या, रुग्णालये आणि आरोग्य सेवांचा आढावा
यात्रेदरम्यान ग्रामीण व जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्या, रुग्ण कल्याण समित्या, जन आरोग्य समित्या तसेच ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळा व अंगणवाड्या तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयांचीही पाहणी करण्यात येणार आहे.
विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी भेटी
प्रशामक उपचार घेणारे रुग्ण, सिकलसेल रुग्ण, संस्थात्मक प्रसूती झालेल्या माता, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेली बालके, क्षयरुग्ण, जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी तसेच कर्करोग तपासणी मोहिमेतील लाभार्थ्यांच्या घरी भेटी देण्याचे नियोजन आहे. या भेटींतून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांची स्थिती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.
आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष
‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान, ‘तिशीचा पल्ला’ उपक्रमांतर्गत ३० वर्षांवरील व्यक्तींची तपासणी व आरोग्यविषयक सल्ला, औषधांचा साठा, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, मनुष्यबळ, स्वच्छता, पाणीपुरवठा, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, संदर्भ सेवा, रुग्णवाहिका तसेच बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवांची तपासणी करण्यात येणार आहे.
माहिती अद्ययावत ठेवण्याचे निर्देश
या वेळी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील आरोग्यविषयक माहिती भौतिक व आर्थिक बाबींसह अद्ययावत ठेवण्याच्या सूचना दिल्या. ‘जन आरोग्य संवाद यात्रा’ हा शासन आणि जनता यांच्यातील आरोग्यविषयक संवादाचा महत्त्वाचा दुवा असून, यात्रेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
.png)
No comments:
Post a Comment