कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची अनोखी गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’चा ट्रेलर लॉन्च
मुंबई (कटूसत्य वृत्त):- कीर्तनातून जनमानसात प्रसिद्ध झालेल्या एका तडफदार तरुणीची कथा सांगणाऱ्या ‘पाच फुटाचा बच्चन’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत दिमाखात लॉन्च करण्यात आला. टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ट्रेलरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.
रंगमंचावर एकपात्री नाटक म्हणून सुरू झालेला ‘पाच फुटाचा बच्चन’ चा प्रवास आता रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचला आहे. चित्रपटात संतांचे अभंग मुखोद्गत असलेल्या आणि कोल्हापुरी भाषेच्या खास बाजातून कीर्तन करणाऱ्या तरुणीची कथा मांडण्यात आली आहे. पाच फूट उंचीच्या या तडफदार कीर्तनकार मुलीला जनमानसात ‘पाच फुटाचा बच्चन’ म्हणून ओळखले जाते.
टीझरमधील ‘रिस्क घ्यायला पाहिजे राजू’ हा संवाद चर्चेत आला असून आदर्श शिंदे यांच्या आवाजातील चित्रपटातील गाण्यालाही रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून श्रुती मधुदीप अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे.
गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिज दाते, पुष्कराज चिरपुटकर, किशोर कदम यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी केले आहे.
पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, कोल्हापूर आणि पुणे येथे चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून कीर्तनकार तरुणीचा संघर्ष, प्रसिद्धीचा प्रवास आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. ९ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment