बार्शी-कुर्डुवाडी पाणीपुरवठा योजनेवरून आ. राजेंद्र राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल!
‘विरोधकांकडून मुद्दाम संभ्रम निर्माण’; १० दिवसांत कुर्डुवाडी ते बार्शीचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा
बार्शी (कटूसत्य वृत्त) : बार्शी शहरातील पाणीटंचाई आणि बार्शी-कुर्डुवाडी पाणीपुरवठा योजनेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र राऊत यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पाणीपुरवठा योजनेबाबत विरोधकांकडून मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांना डांबून ठेवण्याची भाषा करणे, त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे आणि त्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बार्शी शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि योजनेच्या कामाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार राऊत बोलत होते. विरोधकांकडे पाणीपुरवठा मंत्रिपद असताना त्यांनी या योजनेला प्राधान्य दिले असते, तर आज बार्शी शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवले नसते, अशी टीकाही त्यांनी केली.
२९६ कोटींच्या योजनेचे काम युद्धपातळीवर
बार्शी-कुर्डुवाडी पाणीपुरवठा योजना २९६ कोटी रुपयांची असून, या योजनेला २०२४ मध्ये मंजुरी मिळाली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून योजनेचे काम सुरू असल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले. नगरपालिका आपल्या ताब्यात आल्यानंतर या कामाकडे विशेष लक्ष देण्यात आले असून, सध्या दिवसरात्र काम सुरू आहे. पुढील १० दिवसांत कुर्डुवाडी ते बार्शी या टप्प्यातील काम पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला.
योजनेसाठी भूसंपादनाचा मुद्दाही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वीचा राज्यमार्ग असलेल्या ठिकाणी नऊ मीटरचे भूसंपादन झाले असून, ४५ मीटरच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
बार्शी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपालिका आणि संबंधित प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती या पत्रकार परिषदेत चित्रफितीच्या माध्यमातून देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणार
पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध नसून, त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे, असे आमदार राऊत यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना दुखावून कोणतेही काम करायचे नाही. त्यांच्याशी संवाद साधून प्रश्न सोडविण्याची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. शेतीसाठी राखून ठेवलेले उजनीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात आल्याने शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामध्ये आपला दोष काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन ते चार महिन्यांत पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार कामकाज सुरू असल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.
‘आमदार झाल्यापासून एकही दिवस थांबलो नाही’
बार्शी शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आपण आमदार झाल्यापासून अहोरात्र काम करत असल्याचे सांगत, जनतेची दिशाभूल होणार नाही, असा विश्वास आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला. पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, रमेश पाटील, विजय चव्हाण, दीपक राऊत, संदेश काकडे, भारत पवार, भैय्या बारंगुळे, प्रकाश माने, तुळशीदास मस्के यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
No comments:
Post a Comment