वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. सोहेल शेख लिखित ‘द प्रोफेटिक मेथड ऑफ टीचिंग’ पुस्तकाचे प्रकाशन
मोहोळ (कटूसत्य वृत्त) भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून एम. ए. जोहर उर्दू हायस्कूल, मोहोळ येथील लेखक व संशोधक डॉ. सोहेल शेख लिखित ‘द प्रोफेटिक मेथड ऑफ टीचिंग’ या २४ व्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
१५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. डॉ. सोहेल शेख हे शैक्षणिक, साहित्यिक आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या ‘द प्रोफेटिक मेथड ऑफ टीचिंग’ या पुस्तकामध्ये पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या आदर्श शिक्षणपद्धतीचा, अध्यापनाच्या विविध तत्त्वांचा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा अभ्यास करण्यात आला आहे.
पैगंबर मुहम्मद यांनी ज्ञान, नैतिकता, शिस्त, प्रेम, सहिष्णुता आणि उत्तम चारित्र्य यांना शिक्षणामध्ये दिलेले महत्त्व या पुस्तकातून अधोरेखित करण्यात आले आहे. त्यांच्या आदर्श शिक्षणपद्धतीचा आधुनिक शिक्षणव्यवस्थेच्या संदर्भात अभ्यास करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक व संशोधनात्मक प्रयत्न आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना वाचन, ज्ञानार्जन, संशोधन आणि नवविचारांची प्रेरणा दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त या शैक्षणिक पुस्तकाचे प्रकाशन होणे ही वाचनसंस्कृती आणि ज्ञानप्रसाराला प्रोत्साहन देणारी बाब ठरली आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल लेखक व संशोधक डॉ. सोहेल शेख यांचे शैक्षणिक, साहित्यिक व संशोधन क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.

No comments:
Post a Comment