ऑर्किड स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेत चिमुरड्यांच्या वेशभूषेतून अवतरले समाजप्रबोधन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील व्यासपीठ भीती दूर व्हावी, या उद्देशाने सोलापूर येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये नुकतेच एका अभिनव फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बालचमूंनी केवळ मनोरंजनात्मक वेशभूषा न करता ज्वलंत सामाजिक विषय आणि थोर व्यक्तिमत्त्वांचे विचार मंचावर जिवंत केले.
या स्पर्धेचे उदघाटन सोलापुरातील प्रसिद्ध सौंदर्यतज्ञ प्रगती क्षीरसागर, सौ रेणुका राजेश कळमणकर, स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी,शाळेच्या मार्गदर्शिका मीना पारखे,प्राचार्या रश्मी कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दोन दिवसीय या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अनेक भुमिका साकारत आपली कला सादर केली.
सध्या शिक्षण क्षेत्रात गाजत असलेल्या 'पेपरफुटी' व दुष्काळ या अतिशय संवेदनशील विषयावर विद्यार्थ्यानी आपल्या अभिनयातून प्रकाश टाकला. परीक्षा पद्धतीतील त्रुटींवर व दुष्काळी नियोजनावर चिमुकल्याने ओढलेले कोरडे उपस्थितांना विचार करायला लावून गेले.
स्पर्धेमध्ये एका विद्यार्थ्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची हुबेहूब वेशभूषा करून त्यांच्याच खास शैलीत संवाद फेकले. त्याची ती आगळीवेगळी देहबोली आणि दमदार सादरीकरण पाहून संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठले. देशाचे थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या वेशभूषेने उपस्थितांमध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण केले, तर दुसरीकडे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची वेशभूषा साकारून एका विद्यार्थिनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तसेच बालचमूंनी विविध देवी-देवतांची रूपे साकारून संपूर्ण वातावरण भक्तीमय करून सोडले. कोणी हातात बासरी घेतलेला नटखट 'बालकृष्ण' बनले होते, तर कोणी त्रिशूळ धारी महादेव. माता सरस्वती, लक्ष्मी आणि संकटमोचक हनुमानाची हुबेहूब वेशभूषा करून मंचावर आलेल्या चिमुकल्यांना पाहून जणू काही देवच भूतलावर अवतरले आहेत, असा भास उपस्थितांना झाला.
या विषयांसोबतच बहुरंगी कार्टूनची भूमिका करणाऱ्या मुलांनी मंचावर धमाल करत उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी उडवली. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. विद्यार्थ्यांनी केवळ पोशाख परिधान केला नव्हता, तर त्या पात्रांचे महत्त्वही आपल्या छोट्या भाषणांतून पटवून दिले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच सर्व सहभागी मुलांचे कौतुक करण्यात आले.
शाळेचे प्राचार्या, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या शिस्तबद्ध नियोजनामुळे ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरली.

No comments:
Post a Comment