विजापूर रोडवर उभारणार नवे एसटी बसस्थानक; १ हेक्टर जागेच्या प्रस्तावाला मंजुरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 31, 2026

विजापूर रोडवर उभारणार नवे एसटी बसस्थानक; १ हेक्टर जागेच्या प्रस्तावाला मंजुरी

 विजापूर रोडवर उभारणार नवे एसटी बसस्थानक; १ हेक्टर जागेच्या प्रस्तावाला मंजुरी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने विस्तारणाऱ्या जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. विजापूर रस्त्यावर नवीन एसटी बसस्थानक उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या १ हेक्टर जागेच्या प्रस्तावाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) संचालक मंडळाने अधिकृत मान्यता दिली आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या दीर्घकालीन पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे.
जागा संपादनाचे विविध पर्याय खुले
एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने आमदार सुभाष देशमुख यांना दिलेल्या लेखी माहितीनुसार, या बसस्थानकासाठी १ हेक्टर जागा विनामूल्य, नाममात्र दराने किंवा नियमित भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. हे पर्याय शक्य न झाल्यास शासकीय दरानुसार (रेडीरेकनर/शासकीय मूल्यांकनानुसार) जागा थेट संपादित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले असून महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.
विभागीय पातळीवरील पुढील कार्यवाही प्रलंबित
मुख्यालय आणि संचालक मंडळाकडून मंजुरी मिळाली असली, तरी जागा निश्चिती व प्रत्यक्ष भूसंपादनाची पुढील आवश्यक कार्यवाही विभागीय स्तरावर सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळणार असल्याचे पत्रात नमूद आहे.
लाखो नागरिकांना दिलासा मिळणार
गेल्या काही दशकांत जुळे सोलापूर आणि विजापूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढली आहे. सध्या या भागातील नागरिकांना, नोकरदारांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना एसटी पकडण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकावर जावे लागते.
नवीन बस स्थानकाचा काय फायदा?
नागरिकांचा वेळ आणि अंतर्गत प्रवासाचा खर्च वाचेल.
मुख्य बसस्थानकावरील आणि शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल.
शासकीय पातळीवर तत्त्वतः मंजुरी मिळाल्यामुळे आता प्रत्यक्ष जागा संपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन बसस्थानकाच्या प्रत्यक्ष बांधकामाला कधी सुरुवात होते, याकडे समस्त जुळे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages