“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 2, 2026

“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः

 “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम



आपल्या संस्कृतीत गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी गुरू म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक शिकवणारी व्यक्ती नव्हती, तर विद्यार्थ्याला ज्ञान, संस्कार, शिस्त आणि जीवनाची दिशा देणारा मार्गदर्शक होता. विद्यार्थ्याच्या अडचणी समजून घेणे आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणे, हेच गुरूचे खरे कार्य मानले जात होते.
आज काळ बदलला आहे. विद्यार्थी बदलला, समाज बदलला आणि शिक्षणपद्धतीही बदलली. त्यामुळे शिक्षकाची भूमिकाही बदलणे स्वाभाविक आहे. मात्र, या बदलाबरोबरच शिक्षकाच्या मूळ अध्यापन कार्यावर अतिरिक्त कामांचा मोठा डोंगर उभा राहिला आहे.
विद्यांजली, विकसित भारत, खान अकॅडमी, संपर्क फाउंडेशन, अमृत वृक्ष, स्कूल पोर्टल, स्टुडंट पोर्टल, टीचर पोर्टल, एसएचव्हीआर, आयजीओटी कर्मयोगी, वीरगाथा, निपूण, एफएलएन, स्क्व्याप, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, फिट इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, पोषण आहार, यु डायस प्लस, अपार यांसारख्या असंख्य पोर्टलवरील माहिती भरणे, आधार पडताळणी, विविध प्रशिक्षणे, उपक्रमांचे छायाचित्र व दुवे अपलोड करणे, शिष्यवृत्ती, समित्यांचे इतिवृत्त आणि असंख्य नोंदवह्या — या कामांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे.
ही सर्व कामे निरर्थक आहेत, असे म्हणणे नाही. यांतील अनेक उपक्रम शाळा आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच आहेत. परंतु, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, या सर्व कामांचा भार शिक्षकाच्या अध्यापनाच्या वेळेतच का येतो?
विशेषतः प्राथमिक शाळांची स्थिती अधिक चिंताजनक आहे. अनेक प्राथमिक शाळांमध्ये स्वतंत्र लिपिक नाही, शिपाई नाही. त्यामुळे कार्यालयीन कामे, अहवाल, नोंदी, पोर्टलवरील माहिती आणि शाळेची दैनंदिन व्यवस्था यांची संपूर्ण जबाबदारी शिक्षकांवरच येते.
एकीकडे शिक्षकाने वर्गात अध्यापन करायचे, हजेरी घ्यायची, विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासायची, मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना मदत करायची आणि पालकांशी संवाद साधायचा.
तर दुसरीकडे —
पोर्टल भरा... दुवा भरा... छायाचित्र अपलोड करा... नोंदवही भरा... अहवाल तयार करा... प्रशिक्षण पूर्ण करा... बैठक घ्या... इतिवृत्त लिहा...
मग एक साधा प्रश्न उपस्थित होतो — *“शिक्षकाने नेमके शिकवायचे केव्हा?”*
आजचा विद्यार्थी पूर्वीपेक्षा वेगळा आहे. त्याच्याकडे भ्रमणध्वनी आहे, आंतरजाल आहे, माहितीचा अमाप साठा आहे. परंतु माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे विवेकात रूपांतर करणारा शिक्षक त्याला आजही आवश्यक आहे.
विद्यार्थ्याला शिक्षकाचा वेळ हवा आहे. त्याला प्रश्न विचारायचे आहेत, चुका समजून घ्यायच्या आहेत, प्रोत्साहन हवे आहे. त्यासाठी शिक्षकाने त्याच्यासोबत असणे अत्यावश्यक आहे. परंतु शिक्षकाचा मौल्यवान वेळ सतत प्रशासकीय कामांमध्ये खर्च होत असेल, तर शिक्षक-विद्यार्थी संवाद कमी होणे स्वाभाविक आहे.
सर्वात मोठी विसंगती ही आहे की, शिक्षकाने किती पोर्टल भरले, किती छायाचित्रे पाठवली आणि किती अहवाल दिले, याचा हिशेब ठेवला जातो. पण त्या शिक्षकाने वर्गात किती विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, कोणाची अडचण सोडवली आणि कोणाच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला, याचा हिशेब कोण ठेवतो?
शिक्षक हा माहिती-प्रविष्टी चालक नाही, तो केवळ अहवाल तयार करणारा कर्मचारी नाही. तो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा शिल्पकार आहे.
शासनाच्या प्रत्येक उपक्रमाची अंमलबजावणी शाळेपर्यंत पोहोचवताना शिक्षक हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे जसे आवश्यक आहे, तसेच त्याच्या वेळेचे आणि श्रमांचे मूल्य ओळखणेही आवश्यक आहे.
प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, सुलभ प्रणाली आणि पुनरावृत्तीची कामे कमी करणे ही काळाची गरज आहे. एकाच माहितीची अनेक पोर्टलवर वारंवार नोंद करण्याऐवजी व्यवस्था अधिक सोपी आणि विद्यार्थीकेंद्री असावी.
कारण, शाळेची गुणवत्ता किती पोर्टल भरली यावर ठरत नाही, तर वर्गात किती प्रभावीपणे शिकवले जाते यावर ठरते. नोंदवह्या भरल्याने विद्यार्थी घडत नाही; शिक्षकाच्या वेळेने, संवादाने आणि मार्गदर्शनाने विद्यार्थी घडतो.
ही कोणत्याही व्यक्ती वा व्यवस्थेविरुद्धची भूमिका नाही, तर विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका आहे. आज गरज आहे ती शिक्षकाला अधिक कामे देण्याची नव्हे, तर त्याला त्याचे मूळ काम — अध्यापन — पुरेसा वेळ देऊन प्रामाणिकपणे करता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याची.
उद्याचा समाज आजच्या वर्गात घडत आहे. म्हणूनच आज प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे —
*“पोर्टलपेक्षा विद्यार्थ्याला वेळ द्या, अहवालापेक्षा अध्यापनाला महत्त्व द्या आणि शिक्षकाला पुन्हा ‘गुरू’ म्हणून जगू द्या!”*
शेवटी शिक्षकाच्या कामाचे खरे मूल्यमापन एकाच प्रश्नाने व्हावे — “आज शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याला काय शिकवले आणि किती घडवले?” या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक असेल, तरच आपल्या शिक्षणव्यवस्थेच्या प्रगतीला खरा अर्थ आहे.
 *सौ.वैशाली कुंभार* 
मुख्याध्यापिका,राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळा, विनायक नगर, सोलापूर.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages