घाटणे बॅरेज बाधित शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फेरमोजणी करा- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 21, 2026

घाटणे बॅरेज बाधित शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फेरमोजणी करा- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

 घाटणे बॅरेज बाधित शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फेरमोजणी करा- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत घाटणे बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात बाधित होणाऱ्या भोयरे, घाटणे आणि दाईगडेवाडी येथील शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फेरमोजणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच नरखेड व खरकटणे येथील शेतजमिनींच्या संपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

घाटणे बॅरेजमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध अडचणींबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या भोयरे, घाटणे, दाईगडेवाडी, मलिकपेठ, नरखेड आणि खरकटणे या गावांतील शेतजमिनींच्या फेरमोजणीसह भूसंपादनाच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भूसंपादनाच्या सीमा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निश्चित करून भोयरे, घाटणे आणि दाईगडेवाडी या गावांतील जमिनींची फेरमोजणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले. नरखेड व खरकटणे येथील बाधित शेतजमिनींची करण्यात आलेली मोजणी शेतकऱ्यांना मान्य असल्याने, त्यानुसार पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करून जमिनी खरेदीची प्रक्रिया सुरू करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही

घाटणे बॅरेजमधून स्थानिक शेतकऱ्यांना वापरासाठी पाणी उपलब्ध करून देणे तसेच कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून धाराशिव जिल्ह्याला पाणी देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. हे दोन्ही विषय धोरणात्मक स्वरूपाचे असल्याने शासनस्तरावर आवश्यक त्या परवानग्या घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

दरम्यान, बॅरेजच्या खालच्या बाजूस पाण्याच्या प्रवाहामुळे खरडून गेलेल्या जमिनींच्या भूसंपादनाचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. या जमिनींचे संपादन करण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सोलापूर पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या.

बैठकीस उपजिल्हाधिकारी डॉ. सीमा होळकर, धाराशिव पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक, सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पवार, मोहोळचे तहसीलदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख, मोहोळ तसेच घाटणे बॅरेज परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages