पंढरपुरात'स्वच्छतेतून विठ्ठलसेवा' अभियानाला लोकसहभागाची साथ: 18 टन कचरा संकलित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2026

पंढरपुरात'स्वच्छतेतून विठ्ठलसेवा' अभियानाला लोकसहभागाची साथ: 18 टन कचरा संकलित

 पंढरपुरात'स्वच्छतेतून विठ्ठलसेवा' अभियानाला लोकसहभागाची साथ:              18 टन कचरा संकलित   




                                            

                                               

 

      पंढरपूर (दि.14):-लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीचे वाळवंट स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने 'स्वच्छतेतून विठ्ठलसेवा' हे विशेष स्वच्छता व श्रमदान अभियान अत्यंत उत्साहात राबविण्यात आले. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये तब्बल 18 टन कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची  व्यवस्था  आली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

 

         पंढरपूर नगरपरिषद, गाथामूर्थी रामभाऊ महाराज राऊत व शिष्य परिवार व चातुर्मास मधील मंडळी तसेच विठ्ठल रुक्मिणी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, श्री सदगुरू जोग महाराज गुरुकुल, श्री.विठ्ठल आश्रम, त्याचबरोबर खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. स्वच्छता मोहिमेत  700 जणांचा सहभाग.

 

          दर बुधवारी सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत चंद्रभागा वाळवंटात हे स्वच्छता अभियान नियमितपणे चालणार आहे. संतांच्या पावन पावलांनी पुनीत झालेल्या या वाळवंटात भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, निर्माल्य आणि जुने कपडे टाकले जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला होता. यावर उपाय म्हणून पालिकेने या मोहिमेचे आयोजन केले असल्याचे मुख्याधिकारी श्री रोकडे यांनी सांगितले.

 

         या मोहिमेदरम्यान स्वयंसेवकांनी “श्रमदानातून भक्ती” आणि “सहभागातून स्वच्छता” अशा घोषणा देत उपस्थित नागरिक आणि भाविकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली. चंद्रभागा नदी आणि वाळवंट परिसर स्वच्छ राखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक वारकरी आणि पंढरीप्रेमी नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश यातून देण्यात आला असल्याचे गाथामूर्थी रामभाऊ महाराज राऊत यांनी सांगितले.

 

           पंढरपूर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नगरपरिषदेने दर बुधवारी श्रमदान मोहीम आखली आहे. शहरातील सर्व सामाजिक संस्था, तरुण मंडळे, शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांनी दर बुधवारी या अभियानात सक्रिय सहभागी व्हावे आणि 'स्वच्छ पंढरपूर-सुंदर पंढरपूर' या संकल्पनेला बळ द्यावे असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages