मराठा आंदोलनात GEN Z ची एन्ट्री ! शाळकरी मुलींच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले ; सरकारला गंभीर इशारा !
सोलापुरातील आंदोलनाच्या
इतिहासातील पहिलीच नोंद..
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शाळकरी मुली आणि GEN Z विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाल्या, ही बाब विशेष चर्चेचा विषय ठरली.
विद्यार्थिनींनी दिलेल्या जोरदार घोषणांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. सोलापूरच्या मराठा समाजाच्या आंदोलनात GEN Z पिढीतील विद्यार्थ्यांचा प्रथमच एवढ्या थेट स्वरूपात झालेला सहभाग लक्षणीय ठरल्याचे आंदोलकांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, हैदराबाद गॅझेटनुसार शासनाने काढलेल्या जीआरची अंमलबजावणी करून कुणबी दाखले देण्यात यावेत, सारथी संस्थेच्या बंद करण्यात आलेल्या विविध योजना तातडीने सुरू कराव्यात तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी देऊन मराठा तरुणांसाठी उद्योग-व्यवसायाकरिता आर्थिक मदत सुरळीत करावी, अशा विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत.
या मागण्यांची शासनाने तातडीने दखल घ्यावी आणि मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
‘जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास मराठा समाज अधिक तीव्र आंदोलन करेल,’ असा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. शासनाच्या भूमिकेमुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी यापूर्वीही अनेक आंदोलने झाली आहेत. मात्र, यावेळी शाळकरी मुलींसह GEN Z विद्यार्थ्यांचा आंदोलनातील थेट सहभाग हा विशेष ठरला. त्यांच्या घोषणांनी आंदोलनाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले.
शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी प्रत्यक्ष मुलींचा सहभाग होता,त्यांच्यासोबत सकल मराठा समाजाचे माऊली पवार, ज्ञानेश्वर सपाटे,शिवाजी चापले, शिवाजी भोसले, मारुती सावंत, सुनील शेळके, दिनेश डोंगरे, सचिन तिकटे, अशोक भोसले, चंद्रकांत पात्रे, तानाजी माने, राहुल मन्नापुरे, रोहन हावळे, किरण देशमुख, सुरेश जगताप, जनार्दन चव्हाण आदी उपस्थित होते.
==== जिल्हाधिकारी कार्तिकेयन
यांची संवेदनशीलता ===
शाळकरी मुलींनी निवेदन दिल्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी उठून उभे राहिले. त्यांनी उपस्थित मुलींची संवाद साधून मी जिल्हाधिकारी या नात्याने तुम्हाला आणखी काय मदत करू शकतो हे आवर्जून सांगा असे सांगितले. त्याचवेळी मुलींना भविष्यात तुम्हाला काय बनायला आवडेल..! तुमची स्वप्न काय यावर विचारणा केली.तेव्हा उपस्थित मुलींनी मला खाकी वर्दी घालायला आवडेल, तर काहींनी नौदलात, आर्मी मध्ये, डॉक्टर, होण्याची इच्छा असल्याचे जिल्हाधिकारी यांना सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी आनंदामध्ये सर्व शाळकरी मुलींची संवाद साधल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

No comments:
Post a Comment