आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण द्यावे-सोमेश्वर स्वामी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण दिल्यास शिक्षणातील गुणवत्ता वाढणार आहे, नवीन शैक्षणिक धोरण, विचार व कल्पना देखील समोर येणार आहेत, याच उद्देशाने दरमहा शिक्षण परिषद घेत असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सोमेश्वर स्वामी यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित गिरजामाता प्राथमिक मराठी विद्यालय व अक्कलकोट नगरपरिषद शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर केंद्र समन्वयक गौरीशंकर कोळी, गणेश आंबुरे, गिरीजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश आवटे, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण, डिजिटल शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण आणि संशोधन यांसारख्या विषयांवर विचारमंथन करण्यासाठी शिक्षण परिषदेचा उपयोग होत आहे. शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलांना चालना देणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची निर्मिती करणे हे शिक्षण परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणून शिक्षकांनी कार्यशाळेतील तज्ञ व्यक्तींचे विचार आत्मसात केले पाहिजे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून शिक्षण परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश हंचाटे यांनी केले सूत्रसंचालन प्रतिभा माने यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुरेश आवटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी गिरीजामाता प्राथमिक मराठी विद्यालयाचे शिक्षक लक्ष्मण हरजे, जयप्रकाश गुरव यांनी प्रयत्न केले.
चौकट-
शिक्षण प्रक्रियेतील नवीन अभ्यासक्रम स्वीकारावे
शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत नवीन अभ्यासक्रम देखील कार्यान्वित झाले आहे, त्याचा शिक्षकांनी स्वीकार केला पाहिजे, त्या दृष्टीने शैक्षणिक वाटचाल सुद्धा केली पाहिजे असे यावेळी संसाधन व्यक्ती म्हणून राजेंद्र मोहोळकर यांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment