मजूर संस्थांना कामे व कर्जपुरवठ्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : जिल्हा उपनिबंधक मुकुंदराव पवार
सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या सभासदांना भेटवस्तूंचे वाटप; संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू-चेअरमन शंकर चौगुले
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या वतीने सोलापूर शहर तसेच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सभासदांचा स्नेहमेळावा बुधवार रोजी उत्साहात पार पडला. यावेळी लेबर फेडरेशनच्या सभासदांना प्रवासी बॅग व विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा उपनिबंधक मुकुंदराव पवार उपस्थित होते. तसेच सहायक निबंधक आबासाहेब गावडे, कार्यालयीन अधीक्षक अर्जुन तांबट, जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले, व्हाईस चेअरमन मुजीब शेख, संचालक चंद्रकांत अवताडे, राजाभाऊ सुपाते, संजय साळुंखे, अभिराज शिंदे, संस्थेचे सचिव फहीमोद्दीन शेख यांच्यासह शहर व दोन्ही तालुक्यांतील अनेक सभासद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले, व्हाईस चेअरमन मुजीब शेख व संचालक संजय साळुंखे यांनी केले प्रास्ताविकात चेअरमन शंकर चौगुले यांनी सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या कार्याचा अहवाल उपस्थित मान्यवरांसमोर मांडला. मजूर सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू असून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासकीय कार्यालये व सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून मजूर संस्थांना अधिकाधिक कामे मिळावीत, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा उपनिबंधक मुकुंदराव पवार यांनी मजूर सहकारी संस्थांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन सकारात्मक असून, वर्कऑर्डरच्या आधारे संस्थांना कर्जपुरवठा मिळवून देण्यासाठी डीसीसी बँकेमार्फत प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. व्हाईस चेअरमन मुजीब शेख यांनी मजूर संस्थांना अधिकाधिक कामे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. संचालक अभिराज शिंदे यांनी कर्जपुरवठ्याचा प्रश्न मांडला. लोकमत अवॉर्ड २०२६ हा पुरस्कार मॉरिशस येथे मिळाल्याबद्दल संचालक संजय साळुंखे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर सभासदांनी विविध अडचणी व मागण्या मांडल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आभार संजय साळुंखे यांनी मानले.

No comments:
Post a Comment