मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सोलापूरातील सकल मराठा समाजाचा पाठिंबा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. सकल मराठा समाजाचे मुख्य समन्वयक राजन जाधव, भाऊसाहेब रोडगे आणि मतीन बागवान यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला.
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहून त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राजन जाधव यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचा ठाम पाठिंबा आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. केवळ आश्वासने न देता ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजन जाधव यांनी दिला. आगामी काळात आंदोलनाची दिशा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेनुसार निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
.png)
No comments:
Post a Comment