सोलापुरात दरोड्याचा मोठा कट उधळला!
पिस्तूल, जिवंत काडतुसे व प्राणघातक शस्त्रांसह ७ सराईत दरोडेखोरांना गुन्हे शाखेकडून बेड्या; १०.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर (स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडिया)(कटूसत्य वृत्त):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्यीय टोळीचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मुळेगाव रोड परिसरातील अमर ज्योती नगरमध्ये धाड टाकून पोलिसांनी ७ सराईत गुन्हेगारांना शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्तूल, ५ जिवंत राऊंड, २ तलवारी, ३ खंजीर, महिंद्रा XUV 500 कार आणि १ मोटारसायकलसह एकूण १० लाख २९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमर ज्योती नगरमध्ये मध्यरात्री छापा
सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरातील मालमत्ताविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, सपोनि भरत चंदनशिव व पोलीस अंमलदार अमोल यादव (ब.नं. १६६४) यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, काही संशयित इसम प्राणघातक शस्त्रांसह काळ्या रंगाच्या चारचाकी व मोटारसायकलसह अमर ज्योती नगर (प्लॉट नं. ८३, नरसिंग नगर शेजारी, मुळेगाव रोड) येथे दरोडा टाकण्यासाठी जमा झाले आहेत.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भरत चंदनशिव, सपोनि निलेश सोनवणे, पोउपनि विजय बनसुडे, पोउपनि मनोज मोरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून संशयितांना चहूबाजूंनी घेराव घातला आणि ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले ७ सराईत आरोपी
१. मनदीपसिंग दयासिंग संधू (वय ४३, व्यवसाय: मजुरी, रा. गुरुद्वारा लंगर साहिब, नगीना घाट, नांदेड)
२. बलप्रीतसिंग सतनामसिंग खैरा (वय २५, व्यवसाय: मजुरी, रा. खैरा निवास, बडपुरा, गुरुद्वारा गेट नं. ४, नांदेड)
३. अंकुर राजकुमार प्रताप सिंह (वय २८, व्यवसाय: मजुरी, रा. तारवा, ता. अरप, जि. पाटणा, बिहार)
४. लक्ष्मण नामदेव जगताप (वय ३५, व्यवसाय: मजुरी, रा. म्हसोबा मंदिराजवळ, जगताप वस्ती, भागगाव, जि. औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर)
५. सुखदेवसिंग बलविदरसिंग गिल (वय ४२, व्यवसाय: मिस्त्री, रा. वैरोवाल, खडूर साहिब, जि. तरनतारन, पंजाब)
६. दिलीपसिंग हरीसिंग पवार खालसा (वय ३४, व्यवसाय: मजुरी, रा. ब्रम्हसिंग नगर, तरोडा बु., नांदेड)
७. राजेश कन्नीराम राठोड (वय ४४, व्यवसाय: मजुरी, रा. घर नं. १४, नरसिंग नगर, मुळेगाव रोड, सोलापूर)
१० लाख २९ हजारांचा मुद्देमाल व शस्त्रसाठा जप्त
अग्निशस्त्रे व शस्त्रे: १ देशी बनावटीचे पिस्तूल, ५ जिवंत राऊंड (आरोपी अंकुर सिंह याच्याकडून जप्त), २ तलवारी, ३ खंजीर.
दरोड्याचे साहित्य: २ कटावणी, १ छन्नी, १ लांब दोरखंड, ३ जोडी हॅन्डग्लोव्ज, २ नंबर प्लेट, १ कलर स्प्रे बॉटल, ७ मोबाईल.
वाहने: १ काळ्या रंगाची महिंद्रा XUV 500 कार (क्र. MH 12 HB 7700) व १ यामाहा मोटारसायकल (क्र. TG 07 AJ 6467).
एकूण जप्त किंमत: ₹ १०,२९,७००/-
आरोपींचा गंभीर गुन्हेगारी इतिहास उघड
पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी राजेश राठोड याने कबुली दिली की, ते रात्री ते पहाटेदरम्यान सोलापूर शहरात मोठा दरोडा टाकून लूटमार करण्याच्या तयारीत होते.
आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे
दिलीपसिंग खालसा याच्यावर विमानतळ पो. ठाणे (नांदेड), परळी ग्रामीण (बीड) आणि भाग्यनगर येथे खून (भादंवि ३०२), खुनाचा प्रयत्न (भादंवि ३०७) आणि आर्म्स ॲक्टचे तब्बल १३ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मनदीपसिंग संधू याच्यावर नांदेडमध्ये खून (३०२) आणि आर्म्स ॲक्टचे ४ गुन्हे नोंद आहेत.
लक्ष्मण जगताप याच्यावर सिडको व वाळुंज (छत्रपती संभाजीनगर) येथे खुनाचा (३०२) गुन्हा दाखल आहे.
अंकुर सिंह याच्यावर विश्रामबाग (पुणे) येथे जबरी चोरी व आर्म्स ॲक्टचा गुन्हा दाखल आहे.
राजेश राठोड याच्यावर जोडभावी पेठ (सोलापूर) तसेच बारघरा (ओडिशा) येथे जबरी चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पो.शि. १६६४ अमोल यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. ८४७/२०२६, बीएनएस कलम ३१०(४), आर्म्स ॲक्ट ३/२५, ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(२)/१३५ अन्वये गुन्हा नोंदवून सर्व ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भरत चंदनशिव, सपोनि निलेश सोनवणे, पोउपनि विजय बनसुडे, पोउपनि मनोज मोरे, अंमलदार अंकुश भोसले, नंदराम गायकवाड, जावेद जमादार, विजय वाळके, तात्यासाहेब पाटील, वाजीद पटेल, बापू साठे, योगेश बर्डे, आबाजी सावळे, धीरज सातपुते, अमोल यादव, विठ्ठल यलमार, गणेश शिंदे, अभिजीत पवार, शंकर याळगी, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, वसीम शेख, युवराज गायकवाड, भारत पाटील, विशाल कुलकर्णी, सायबरचे मच्छींद्र राठोड तसेच चालक शाम सुरवसे, परबत आणि राजशेखर पाटील यांनी केली आहे.
.png)
No comments:
Post a Comment